मुंबई । श्रेया संतोष शिंदे या महिलेने भारतामधील सर्वात कमी वजनाच्या मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळाला जन्म दिला. 26 महिन्यांच्या गरोदर असलेल्या या महिलेला बाळंतपणातील अडचणींमुळे कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला बाळंतपणामुळे येणारा उच्च रक्तदाब जडला होता. या महिलेची प्रसूती योग्य वेळेत झाली नसती तर उच्चदाब नियंत्रित करण्यासाठी तिला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले असते. अशा परिस्थितीमध्ये गर्भाशयामध्ये असलेल्या बाळाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. अल्ट्रासोनोग्राफीद्वारे ही महिला 26 आठवड्यांची गरोदर असल्याचे निदान झाले होते. मात्र, प्रत्यक्षात गर्भाशयातील बाळाची वाढ 24 आठवड्यांएवढीच झाली होती. त्यामुळे 26व्या आठवड्यात या महिलेला प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मेघा अनाजे यांच्या सल्ल्यानुसार कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी या महिलेने जन्म दिलेल्या स्वरा या मुलीचे जन्मत: वजन 455 किलोग्रॅम एवढे होते.
या महिलेच्या प्रसूतीनंतर बाळाला चार महिने एनआयसीयूमध्ये (नीओनातल इंटेन्सिव्ह केअर युनिट) ठेवले. या बाळाचा श्वासोच्छवास एका नलिकेद्वारे सुरू होता तसेच नलिकेद्वारेच या बाळाला द्रव अन्नपदार्थ पुरवण्यात येत होते. मुदतपूर्व प्रसूती होऊनही या बाळाची प्रकृती आता ठीक असून तिचे वजन 2.5 किलोग्रॅमएवढे वाढले आहे. याबाबत कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. राम नारायण म्हणाले, एनआयसीयू विभागातर्फे नवजात शिशूंचे प्राण वाचवणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. आमच्या येथील व्यवस्थापन असे आहे की येथील डॉक्टरमंडळी तंत्रज्ञान आणि कौशल्याद्वारे रुग्णाला नवीन आयुष्य प्रदान करतात. प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतर निर्माण होणार्या गुंतागुंतीवर मात करण्यासाठी आमचे डॉक्टर पथक सदैव सज्ज असते. त्यामुळेच आई आणि बाळ सुरक्षित असून त्यांची प्रकृती उत्तम आहे तसेच या प्रसूतीवेळी उपस्थित असणारे डॉ. संजीव वेंगलथ म्हणाले, प्रसूती व्यवस्थापनाद्वारे पहिल्या काही मिनिटांमध्येच पुढील काळातील घडामोडींबाबत निर्णय घेतले जातात. मुदतपूर्व प्रसूतीदरम्यान महिलेला मध्यवर्ती ठेवून रुग्ण महिला तसेच तिच्या बाळावर उपचार केले जातात. या प्रकरणात नेमकी हीच गोष्ट केल्यामुळे बाळाची योग्य प्रकारे वाढ झाली.
नऊ महिन्यांनंतर जन्म दिलेल्या अर्भकांचे वजन सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 किलोग्रॅमदरम्यान असते. मुदतपूर्व जन्म झालेल्या आणि 1 किलो वजन असलेल्या अर्भकांचा जीव वाचण्याचे प्रमाण साधारणपणे 70 ते 80 टक्के एवढे असते. मात्र, चांगल्या सेवासुविधा असलेल्या ठिकाणी या अर्भकांवर उपचार झाल्यास हे प्रमाण 90 ते 95 टक्के एवढे वाढते. दर तीन महिन्यांनी बाळाच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. हे बाळ पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याच्या वाढीच्या विकसनावर शिक्कामोर्तब केले जाते. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करणार्या महिलांमध्ये प्रसूतिपूर्व अर्भकांचा जन्म होण्याची शक्यता अधिक असते. महाराष्ट्रामध्ये प्रसूतीदरम्यान अर्भकांचा मृत्यूदर हा 1000 मध्ये 24 एवढा आहे. त्यापैकी 2-3 अर्भकांचा जन्म हा प्रसूतीपूर्व झालेला असतो.