उल्हासनगर (सुनिल इंगळे)। तब्बल 30 कोटी रूपये किंमतीच्या भूखंडाची सनद घोटाळ्यात मुख्य भूमीका बजावणार्या सेवलदास बिजलानी यालाा वयाच्या 15 व्या वर्षी मिळाली असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे 15 व्या वर्षाच्या अल्पवयीन असलेल्या सेवलदासला महाराष्ट्र जमीन महसूल कायद्या अंतर्गत भूखंडाची सनद मिळू शकतो का, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोती दुसेजा यानी 2014 मध्ये घनश्यामदास तुनिया, किशन लाहोरी, राजेश गुरदासमल दुदानी, मुकेश गुरदासमल दुदानी, चंदा लालचंद चावला यांच्याबरोबर मिळून 15 हजार चौरस फुटाची प्लॉट क्र. 620, शिट नंबर 76 ही खरेदी केली. या मालमत्तेची नोंदणी करताना या मालमत्तेला सनद नाही, मग नोंदणी कशी होऊ शकते, असा प्रश्न दुसेजा यानी भागीदाराना विचारला असता त्यानी या भूखंडाची बोगस सनद बनविणार असल्याचे सांगितले. दुसेजाना चुकीचे काम करायचे नसल्याने त्यानी भागीदारीचे पैसे परत घेत, या भूखंडाची सनद कशी बनली याचा तपास करण्यासाठी महसुल विभागाचे अप्पर सचिव याना तक्रार दिली होती. या तक्रारीचा दुसेजा यानी तब्बल दोन वर्षाचा पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिका-यानी शासनाला दिलेल्या अहवालात सनद तपासणीबाबत पुण्याच्या सि.आय.डी. विभागाने सनदांवरच्या सहया हया बोगस असल्याचे नमुद केले आहे. त्यानुसार तहसिलदार उत्तम कुंभार यांच्या आदेशाने भूखंडावर दोन महिन्याभरापुर्वी फलक ही लावला आहे.
पाच जणांना अंतरिम जामिन
मोती दुसेजा यानी सांगितले कि या प्रकरणात दोषी आढळलेले लिपीक प्रकाश गायकवाड आणि ईश्वरी पमनानी यांची कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशी चालू आहे. याप्रकरणात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने 26 ऑक्टोबर 2017 रोजी बोगस सनद बनविणारे किशन लाहोरी, घनश्यामदास तुनिया आदी दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अखेर माध्यमांच्या दबावानंतर 10 नोव्हेंबर रोजी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यानी घनश्यामदास तुनिया, किशन लाहोरी, राजेश गुरदासमल दुदानी, मुकेश गुरदासमल दुदानी, चंदर चावला, सेवलदास बियाजलानी, भागीबाई बिजलानी यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातील प्रमुख पाच आरोपीनी अंतरिम जामिन मिळविला आहे. सेवलदास बिजलानी आणि त्याची पत्नी भागीबाई यांच्या नावाने असलेल्या सनदा बोगस असल्याचा दावा हे प्रकरण उघड करणारे मोती दुसेजा यांचा आहे. दुसेजा यांनी सांगितले की सेवलदास बिजलानी यांनी उल्हासनगर गुन्हे शाखेत दिलेल्या जबाबात त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये 1 ऑक्टोबर 1948 ला झाला असल्याचे सांगितले. सेवलदास हा अवघ्या 12 वर्षाचा असताना 1960 मध्ये बोगस सनद बनविलेल्या भूखंडाच्या क्लेम केला होता आणि 1963 मध्ये 15 वर्षाचा असताना सनद मिळाली होती, असे सनदेवर नमूद केले आहे. ही बाब सदरची सनद बोगस असल्याचे जाहीर करते. या प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. गडकरी यांच्या समोर सेवलदास आणि त्यांची पत्नी भागीबाई यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे. सेवलदासचे वय हे 72 वर्ष असून त्यांना तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिल्यास या प्रकरणात बोगस सनद बनविणारे कोण आहेत, हे समोर येऊन शेकडो करोड रुपयांचा उल्हासनगर मधील भूखंड घोटाळा समोर येण्याची दाट शक्यता आहे, असे मोती दुसेजा यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांना यासंदर्भात3 विचारले असता महाराष्ट्र जमीन महसूल कायद्या अंतर्गत जमिनीचा क्लेम करण्यासाठी किमान वय 18 वर्ष आवश्यक असल्याचे सांगितले. सेवलदास यांच्या सनदेबाबत गिरासे याना विचारले असता सदरची सनद विवादित असल्याचे त्यांनी सांगितले.