बीएचआर घोटाळ्यात अटकेतील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जळगाव: बीएचआरमधील अपहार व फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या पाच आरोपींना रविवारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. यात सुजीत बाविस्कर उर्फ हा वाणी या कंडारेच्या हस्तक असलेल्या बीएचआरमधील कर्मचार्याने पुणे आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीत कशा पद्धतीने गुन्हा घडला, गुन्ह्याची नेमकी पद्धत कशी याची सविस्तर माहिती दिली.
गुन्ह्यातील संशयित महावीर जैन याच्या घरात बीएचआर संबंधित फाईल आर्थिक गुन्हे शाखेने हस्तगत केली होती. ती फाईल न्यायालयात सादर करण्यात आली. यासह इतर मुद्यांना अनुसरुन सरकार पक्षाने जोरदार युक्तिवाद करत संशयितांना वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. युक्तिवादाअंती न्यायालयाने पाचही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या प्रकरणात अटक नसलेला जितेंद्र कंडारेसह इतर संशयितांचीही चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. घरकुल घोटाळा खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची बीएचआर घोटाळ्यातही सरकारी वकील म्हणून शासनाकडून विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
साडेतीन तास कामकाज
बीएचआरमधील अपहार व फसवणूक प्रकरणात अटक असलेले सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांखला (40, रा. शिव कॉलनी), महावीर मानकचंद जैन (37 , रा.गुड्डूराजा नगर), ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (45, रा. देवेंद्र नगर) सुजीत सुभाष बाविस्कर (वय 42, रा.पिंप्राळा) व कंडारेचा वाहनचालक कमलाकर भिकाजी कोळी (28, रा. के. सी. पार्कमागे, जळगाव) या पाच जणांच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यांना रविवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.
न्या. एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सकाळी 11 ते दुपारी अडीच असे साडेतीन तास कामकाज झाले. अटकेतील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपास यंत्रणेने मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले. आरोपीतर्फे अॅड. उमेश रघुवंशी यांनी विवेक ठाकरेसह सुजीत बाविस्कर व चालक कमलाकर कोळी यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली.
ठाकरेने कोठडीत असतानाही मिळवले ठेवीदारांचे फसवणूक न झाल्याचे शपथपत्र
अॅड. प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना मुख्य आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर व इतर आरोपींना अजून अटक झालेली नाही. विवेक ठाकरे पोलीस कोठडीत असताना त्याने आमची फसवणूक झाली नाही या आशयाचे नऊ जणांचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. याच मुद्याला धरून सरकारी वकिलांनी ठाकरे याचा किती दबाव आहे हे या शपथपत्रावरून सिद्ध होत आहे. ठाकरे यांना जामीन दिला तर ते तपास यंत्रणा व ठेवीदारांवर दबाव आणतील, असा जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकिलांच्या मुद्याला विरोध करुन ठाकरे यांचे वकील उमेश रघुवंशी यांनी पोलीस कोठडीत असताना ठाकरे टेम्परींग कसे करणार? पोलीस इतरांशी कसे बोलू देतील, असा प्रश्न केला. यावेळी सरकारी वकील व ठाकरे यांचे वकील यांच्यात न्यायालयात जोरदार खडाजंगी झाली.