अविवाहितांच्या वल्गना!

0

संघ परिवाराची एक सुंदर मिलीभगत असते. परिवारातल्या एकाने वादग्रस्त विधान करायचे आणि त्याची प्रतिक्रिया देताना दुसर्‍याने हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे किंवा आपला पक्ष त्याच्याशी सहमत नाही, असे सांगायचे हे ठरलेले असते. एखाद्या मुद्यांवर देशात चर्चा सुरू करायची असली की, सगळे संघ पोपट पटापट बोलायला लागतात. हे आता आपल्याही अंगवळणी पडले आहे. गीता राष्ट्रग्रंथ करायचा मुद्दा असो की, संविधान समीक्षा असो हे मुद्दे लोकांपुढे फेकले जातात आणि त्यांना अपेक्षित अशी चर्चा रंगायला लागली की, त्याला जनमताचा मुलामा द्यायला संघ परिवार मागेपुढे पाहत नाही, असा आजवरचा अनुभव आहे.

सगळा देश आपल्या एकछत्री अमलाखाली यावा म्हणून हिटलर नवनव्या क्लुप्त्या काढीत असे, या कामात त्याचा प्रचारमंत्री गोबेल्स तरबेज होता. एखादी खोटी गोष्ट शंभरदा सांगितली की, त्याची सत्यता पटायला लागते. यावर त्याचा विश्‍वास होता. म्हणूनच त्याच्या असल्या प्रकाराला गोबेल्स नीती म्हणून प्रसिद्धी मिळाली. गोबेल्स केवळ एवढेच करीत नव्हता, समूहाची मानसिकता त्याला उत्तम माहित होती. लोक कशाच्या मागे वेड्यासारखे धावत सुटतात? हे तो जाणून होता. लोकांना सतत कसलेतरी काल्पनिक खाद्य लागते, काही विषय हवे असतात, त्याच्या चर्चेत लोक तहानभूक विसरून भिडतात, असा त्याचा अनुभव होता. त्यासाठी काल्पनिक शत्रू आणि मुद्दे निर्माण कार्यात गोबेल्सचा हातखंडा होता. आधी काल्पनिक शत्रू उभा करायचा आणि मग त्याचा सामना करण्यासाठी सगळ्यांना कामाला लावले जात होते. लोकही त्याला राष्ट्रीय आयाम देऊन आपण जे करीत आहोत,त्यापेक्षा दुसरे राष्ट्रहिताचे कोणतेही कार्य असूच शकत नाही, हा मुलामा देऊन कार्यमग्न होत असत. आपल्या देशातल्या संघवाल्यांची नाझी राजवट आणि हिटलर कायमच आदर्श राहिला आहे. हिटलरचे स्वस्तिक चिन्ह तर त्यांना प्राणाहून प्रिय आहे.गोळवलकर गुरुजींनी आपल्या लिखाण, भाषणातून या राजवटीचे अनेकदा गोडवे सुद्धा गायले आहेत. त्याच संघ परिवाराच्या पुढाकारात नागपूरच्या रेशीमबागवर तीन दिवसांच्या धर्मसंस्कृती महाकुंभाचा काल समारोप झाला.आपले सुधारणावादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष पुन्हा एकदा ‘हम दो-हमारे दस’ हा राग आळवला गेला. बद्रीनाथ पिठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी देशातल्या वाढत्या मुस्लीम संख्येबद्दल काळजी व्यक्त करून हिंदूंनी सुद्धा यापुढे किमान दहा मुलांना जन्म दिला पाहिजे आणि त्यांच्या पालनपोषणाची काळजी देवावर सोडली पाहिजे, असे अमूल्य मार्गदर्शन केले. त्यापुढे जाऊन शंकराचार्य असेही म्हणाले की, प्रत्येक हिंदूंच्या ‘एक हाथ मे भाला और दुजे हाथ मे माला’ या सूत्राचा अवलंब करायला हवा. विहिंप आणि बजरंग दलाच्या प्रभावात असणारे सगळे संघी साधू एकसारखे म्हणजे जेवढे शिकवले तेवढेच बोलतात, या आधी साक्षी महाराजांनी या दशसूत्रीचा उल्लेख केला होता, त्यांच्याही आधी हे कथित संन्यासी संसारी माणसांना डझनावारी मुले पैदा करण्याचा सल्ला देत आले आहेत. संघ परिवाराची एक सुंदर मिलीभगत असते. परिवारातल्या एकाने वादग्रस्त विधान करायचे आणि त्याची प्रतिक्रिया देताना दुसर्‍याने हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे किंवा आपला पक्ष त्याच्याशी सहमत नाही, असे सांगायचे हे ठरलेले असते. एखाद्या मुद्द्यांवर देशात चर्चा सुरू करायची असली की, सगळे संघ पोपट पटापट बोलायला लागतात, हे आता आपल्याही अंगवळणी पडले आहे. गीता राष्ट्र ग्रंथ करायचा मुद्दा असो की, संविधान समीक्षा असो हे मुद्दे लोकांपुढे फेकले जातात आणि त्यांना अपेक्षित अशी चर्चा रंगायला लागली की, त्याला जनमताचा मुलामा द्यायला संघ परिवार मागेपुढे पाहत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. देव, धर्म आणि अध्यात्म यांच्या नशेत साधूंना जगातल्या समस्यांचा विसर पडलेला असतो. शिवाय, ब्रह्म सत्य जगत मिथ्या नावाची बॅटरी सतत त्यांच्या हातात असते. त्यामुळे संसारी व्यक्तिला जाणवत असलेल्या समस्या त्यांच्या लेखी सगळा भ्रम असतो. मुळात भ्रमाचा जगात जगतात हे लोक आणि उद्भवणार्‍या संकटाना भ्रम ठरवून मोकळे होतात. त्यामुळे संसारी व्यक्तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, लग्न करणे, ते झाल्यावर काय दिव्य करावे लागते, मुलांच्या जन्मानंतर सध्यकाळात कोणत्या नियोजनाचे डोंगर चढावे लागतात, याच्याशी या सल्लागार साधूना कसलेही सोयरसुतक नसते. मात्र, विश्‍वाचा गाडा आपणच चालवितो, याची कीक त्यांना लागलेली असते. एखादी गोष्ट कलावंत किंवा समूह कशी काय सहज करतो? असा प्रश्‍न आपल्याला पडला की, वडीलधारी मंडळी नेहमी म्हणतात, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! याचा अर्थ ज्यांना ठाऊक नाही ते दहा मुले पैदा करण्याचा सल्ला देताहेत. ये कुछ जादा नही हुवा? संघ परिवारातल्या कुणातरी व्यक्तिने आधी या साधूंच्या सल्ल्याचे अनुकरण करावे. दहा मुलांचा बाप व्हावे आणि मग आधी केले मग सांगितले या न्यायाने समाजाला मार्गदर्शन करीत सुटावे. मुस्लीम मूलतत्वादी अडाणी मुस्लीमांना इस्लाम खतरे मे है! अशी हाकाटी देऊन दिशाभूल करीत असतील तर आपणही त्याच मार्गाने जात आहोत, याचेही भान हे कथीत साधू विसरले आहेत. मुस्लीमांना शिव्या देत, त्यांच्याच मार्गाची भ्रष्ट नक्कल करण्याला हिंदुहित समजले जात असेल तर हे हित नसून हाराकिरी असल्याचे कुणीतरी सांगायला हवे. सध्याच्या काळात असंख्य मुस्लीम दोन किंवा एका अपत्यावर समाधान मानत आहेत. यामागे जाणीव असेल किंवा परिस्थितीची अपरिहार्यता काहीही असेल. पण, वस्तुस्थितीची बोचणारी सत्यता सगळ्याच समाजाला होत आहे. संघ परिवार मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरण्याच्या प्रयत्नात आहे. स्त्रीला मुले जन्माला घालणारी मशीन समजण्याची बुरसटलेली मानसिकता यातून दिसतेच.परंतु, पुरुषप्रधानतेचा अहंकारी दर्प सुद्धा झाकत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.