अविश्वास प्रस्ताव लटकला!

0

अविश्वास ठरावाच्या मागणीवरून संसदेत गदारोळ, कामकाज ठप्प
शिवसेना तठस्थ राहणार; सरकार पाडणे उद्देश नाही : टीडीपी खासदार

नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस या राजकीय पक्षांनी केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी नोटीस देऊनही हा प्रस्ताव चर्चेत न आल्याने या दोन्हीही पक्षांच्या खासदारांनी संसदेत जोरदार गदारोळ घातला. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. या प्रस्तावाला पाठिंबा असलेल्या खासदारांची संख्या मोजता यावी, यासाठी शांतता राखा, असे आवाहन लोकसभेत सभापती सुमित्रा महाजन यांनी केले होते. परंतु, ऑल इंडिया अन्ना द्रमुकच्या खासदारांनी कावेरी पाणीवाटपाच्या प्रश्नावरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा प्रस्ताव दिवसभरासाठी लटकला, परिणामी तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेसच्या खासदारांनी गोधळ घातला. अखेर या गदारोळामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकार अविश्वास प्रस्तावावर चर्चेस तयार असल्याचे सांगितले. तर संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी आम्ही अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यास तयार आहोत, आमच्याकडे बहुमत आहे, अशी भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, शिवसेनेने मात्र प्रस्तावावर आपण मतदान करणार नाही, तठस्थ राहू अशी भूमिका स्पष्ट करून अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारला दिलासा दिला आहे.

प्रस्तावाच्या बाजूने असलेले सदस्य मोजता आले नाहीत!
केंद्रातील मोदी सरकारविरोधात वायएसआर काँग्रेसने गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. या नोटीसला आधी तेलुगू देसम पक्षाने पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर तो मागे घेत आता स्वतंत्र नोटीस दिली आहे. लोकसभेच्या 539 जागांपैकी भाजपचे सद्या 274 सदस्य आहेत. लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला 270 सदस्यसंख्या अवश्यक आहे. लोकसभा सचिवालयाला अविश्वास प्रस्तावाच्या तीन नोटीस मिळाल्या असून, त्यात दोन तेलुगू देसम पक्षाच्या तर एक वायएसआर काँग्रेसची आहे. या नोटीसनुसार, अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. त्यावर मला प्रस्तावाच्या बाजूने असलेल्या सदस्यांची संख्या मोजू द्या, म्हणून सभापती सुमित्रा महाजन यांनी शांततेचे आवाहन केले. त्याचवेळी कावेरी पाणीवाटप प्रश्नावरून एआयडीएमकेच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रस्तावाच्या बाजूने किती सदस्यसंख्या आहे हे सभापतींना मोजता आले नाही. जर सभागृहाचे कामकाज शांततेत सुरु झाले आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने किमान 50 सदस्यांचे मत असेल तर हा प्रस्ताव पुढे सरकू शकतो, असे सभापतींनी सांगितले. तथापि, गदारोळामुळे पुढे कामकाज होऊ शकले नाही, परिणामी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

गदारोळामुळे कामकाज तहकूब
दरम्यान, तेलुगू देसम पक्षाच्या सदस्यांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर तसेच कावेरी पाणीवाटप प्रश्नासह कोणत्याही प्रश्नावर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. सभागृहात गदारोळ सुरु असतानाच सिंह यांनी आपण अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. परंतु, गदारोळ काही कमी झाला नव्हता. दुसरीकडे, राज्यसभेतही असाच गदारोळ पहावयास मिळाला. अविश्वास प्रस्ताव दाखल होण्यासाठी तेलुगू देसमच्या खासदारांनी कामकाजाला सुरुवात होताच गदारोळास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सुरुवातीला दुपारी बारा वाजेपर्यंत व नंतरही गदारोळ कायम राहिल्याने दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब केले. तेलुगू देसमने आपल्या खासदारांना व्हिप जारी करून सभागृहात हजर राहण्यास बजावले असून, पक्षाचे नेते आर. एम. नायडू यांनी अविश्वास प्रस्तावावर आम्ही सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही जास्तीत जास्त पाठिंबा मिळवत आहोत, हे सरकार पाडण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.