अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची कुर्‍हाड

0

पँट्रीकार कर्मचार्‍यावरील हल्ल्याची रेलवे सुरक्षा बलाकडून गांभीर्याने दखल ; तीन रेल्वे मार्गावर विशेष पथकाकडून धडक कारवाई

भुसावळ- डाऊन 12167 कुर्ला-बनारस एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीकार कर्मचारी इन्द्रेस चव्हाण (27) वर अवैध खाद्य विक्रेत्याने ब्लेड मारून हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. ‘दैनिक जनशक्ती’ने याबाबत मंगळवारच्या अंकात हप्तेखोरीमुळे प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्याने यंत्रणेने या बाबीची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी दिवसभरात सुमारे 40 वर अवैध विक्रेत्यांवर कारवाईने केल्याने खळबळ उडाली. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त अजयकुमार यांनी अवैध खाद्यविक्रेत्यांच्या बंदोबस्तासाठी भुसावळ-ईगतपुरी, भुसावळ-बडनेरा व खंडवा मार्गावर धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये विशेष अधिकार्‍यांचे पथक तैनात केले असून भुसावळ कॉम्प्लेक्ससाठी दहा कर्मचार्‍यांच्या पथकाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी 40 वर विक्रेत्यांवर कारवाई
रेल्वे सुरक्षा बलाचे दोन अधिकारी व चार कर्मचार्‍यांचा सहभाग असलेल्या पथकाकडून बडनेरा, खंडवा तसेच ईगतपुरी मार्गावरील रेल्वे गाड्यांची अचानक तपासणी केली जात असून अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे तसेच दंड न भरणार्‍या विक्रेत्यांवर न्यायालयात खटले दाखल केले जात असल्याचे सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे म्हणाले. सायंकाळपर्यंत 40 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत हा आकडा 50 पर्यंत पोहोचेल, असे त्यांनी सांगितले. नियमित कारवाईसाठी पथकाचे गठण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

खंडव्यात गुन्हा, आरोपीचा कसून शोध
डाऊन 12167 कुर्ला-बनारस एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीकार कर्मचारी इन्द्रेस चव्हाण (27) वर हल्ला केल्याप्रकरणी खंडवा लोहमार्ग पोलिसात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले की, अद्याप हा गुन्हा आमच्याकडे वर्ग झालेला नाही मात्र गुन्ह्याबाबत माहिती घेतली असून शक्यतो आरोपी बर्‍हाणपूर परीसरातील असल्याचा संशय असून त्या दृष्टीने शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.