वर्षभरात 33 लाखांचा मुद्देमाल जप्त
भोसरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘ई’ विभागाने जानेवारी ते डिसेंबर 2017 दरम्यान परराज्यातील तब्बल 63 हजार 800 लिटर अवैध दारुसाठा जप्त करून या प्रकरणांमधील आरोपींना अटक केली. तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे 15 हजार लीटर रसायन जप्त करून त्याची विल्हेवाट या विभागामार्फत लावण्यात आली. वर्षभरामध्ये 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात या विभागाला यश आले असून, 157 आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. तसेच 115 आरोपींना या प्रकरणांमध्ये अटक केली होती.
वार्षिक उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पिंपरी येथे कार्यालय आहे. महापालिका, नगरपालिका हद्दीमधील मद्यालये सुरू करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या विभागाला देण्यात आलेले महसूल गोळा करण्याचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. करांशिवाय उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांच्या हद्दीतील विनापरवाना मद्यविक्री आणि निर्मिती यांच्यावरही सातत्याने कारवाई केली जात आहे. पिंपरी, चिंचवड, खडकी, दापोडी आणि वाल्हेकरवाडी हा परिसर ‘ई’ विभागाच्या अंतर्गत येतो. या भागातून 33 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. वाल्हेकरवाडी भागातील ढाब्यामध्ये सर्रास परराज्यातील बनावट दारूची ग्राहकांना विक्री केली जाते.तसेच खडकी परिसरातील गवळीवाडा येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री केली जाते. या भागात सर्वात जास्त कारवाई गेल्या वर्षभरामध्ये करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय ढेरे, उपनिरीक्षक सूरज दाबेराव आणि त्यांच्या कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.