कवठे येमाई : टाकळी हाजीतील यमाई मंदिराकडे जाणार्या कच्च्या रोडजवळ ओढ्यानजीक काटवणात सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापा टाकत पोलिसांनी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य, 8 प्लास्टिक बॅरल कच्चे रसायन असा सुमारे 16 हजार रुपयांचा माल नष्ट केला.
पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी संयमी भूमिका घेत सर्वच अवैध दारू, ताडी विक्री करणार्यांना हे धंदे बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावातील ग्रामसभेत दारू व अवैध धंदे बंद करण्याचा ठराव करण्यात आला. असे असताना गावात यमाई मंदिराकडे जाणार्या कच्च्या रोडजवळ ओढ्यानजीक काटवणात दारूभट्टी सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार बाळकृष्ण साबळे, साळवे, पालवे यांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी छापा मारत 16 हजार रुपयांचा माल नष्ट केला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.