अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई

0

हडपसर वाहतूक शाखेने केल्या 123 रिक्षा जप्त

हडपसर : नियमांची पायमल्ली करणार्‍या बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या 123 रिक्षांवर हडपसर वाहतूक शाखेने कारवाई जप्त केल्या. गुरुवारी दिवसभर ही कारवाई करण्यात आली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

विनाकागदपत्रे, विना बॅच, स्क्रॅप झालेले, गणवेश परिधान न करणार्‍या, अल्पवयीन रिक्षाचालक व बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करून वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवणार्‍या तब्बल 123 रिक्षांवर हडपसर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला होता. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांची धावपळ उडाली होती. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारीच हडपसर पोलिस ठाणे व वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्तरित्या 106 रिक्षांवर कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान गाडीतळ, हडपसर गाव, मगरपट्टा चौकाने मोकळा श्‍वास घेतला, अशी माहिती हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शब्बीर सय्यद व पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्‍वर मेहेत्रे यांनी दिली. या कारवाईत सातत्य राहिल्यास वाहतुकीला अडथळा करणार्‍या व नियमांची पायमल्ली करणार्‍या रिक्षा चालकांवर निश्‍चितपणे अंकुश बसेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.