अवैध फलक हटविण्यासाठी 1 कोटींचा ठेका

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील अवैध जाहिरातफलक हटविण्यासाठी व त्याचे लोखंडी साहित्य नेहरूनगर येथील गोदामात जमा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. दोन वर्षे कालावधीच्या कामकाजासाठी या ठेकेदाराला एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून महापालिका हद्दीतील अवैध जाहिरातफलक स्ट्रक्चरसह काढून टाकण्याची कारवाई करण्यात येते. तसेच लोखंडी साहित्य महापालिकेच्या नेहरूनगर येथील गोदामात जमा करण्यात येते. हे कामक ाज ठेकेदारी पद्धतीने करण्यात येते. त्यासाठी दोन वर्षे कालावधीकरिता ऑनलाइन निविदा दर मागविण्यात आले.

दोन वर्षांसाठी ठेका
निविदा दर एक कोटी निश्‍चित करण्यात आला. त्यानुसार गणेश एंटरप्रायजेस यांचे लघुतम दर प्राप्त झाले. त्यांनी सादर केलेल्या दरांमध्ये जमिनीवरील आणि इमारतीवरील जाहिरात फलकांसाठी वेगवेगळे दर ठरविण्यात आले आहेत. जमिनीवरील 10 बाय 10 फूट या आकाराच्या फलकासाठी सात हजार 800 रुपये, तर 20 बाय 60 फूट या आकाराच्या फलकासाठी एक लाख 40 हजार रुपये दर सादर केला. इमारतीवरील 10 बाय 10 फूट आकाराच्या फलकासाठी नऊ हजार 700 रुपये, तर 20 बाय 60 फूट आक ाराच्या फलकासाठी एक लाख 98 हजार रुपये दर सादर केला. जमिनीवरील फलक काढण्यासाठी गणेश एंटरप्रायजेस यांनी 200 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत दर कमी केले, तर इमारतींवरील फलक काढण्यासाठी 300 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत दर कमी केले. गणेश एंटरप्रायजेस यांचे दर कमी असल्याने त्यांची निविदा स्विकारण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. त्यानुसार त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.