अवैध विक्रेत्याची दादागिरी ; पँट्री कारमधील कर्मचार्‍यावर ब्लेडने वार

0

भुसावळ- एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अवैध विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला असून सोमवारीदेखील एका विक्रेत्याने पँट्रीकार कर्मचार्‍यावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना सोमवारी गाडी क्रमांक 12167 कुर्ला-बनारस एक्स्प्रेसमध्ये घडली. भुसावळ स्थानकावरून सोमवारी सकाळी 8.15 वाजता गाडी खंडव्याकडे निघाल्यानंतर पॅन्ट्रीकार कर्मचारी इन्द्रेस चव्हाण (27) याच्या डाव्या गालावर एका अवैध विक्रेत्याने ब्लेडने हल्ला चढवल्याने इन्देसचा गाल फाटला. यानंतर हल्लेखोर अवैध विक्रेत्याने गाडीची धोक्याची साखळी ओढत पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.

हप्तेखोरीमुळे रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांचे दुर्लक्ष
पॅसेंजर गाड्यांसह एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांची दादागिरी नवीन नाही. प्रवाशांना धमकावण्यासह मारहाण करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत तर कारवाईची जवाबदारी असलेले लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाकडून आर्थिक व्यवहारापोटी कारवाई करीत नसल्याचा आरोप आहे. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून दररोज तसेच दरमहा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणेला पैसे दिले जात नसल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता अवैध विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आहे.