अवैध सावकारी प्रकरण : संजय बंबला सात दिवसांची पोलिस कोठडी

Illegal Lending Case in Dhule : Sanjay Bumb remanded in police custody for seven days धुळे : राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरणात मुख्य आरोपी व अवैध सावकार राजेंद्र बंबचा मोठा भाऊ संजय बंब याला मालेगाव शहरातून आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या. आरोपीला गुरुवारी धुळे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोट्यवधींचे घबाड बंब कुटुंबियांकडून आतापर्यंत जप्त करण्यात आल्याने राज्यात धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण चर्चेत आहे तर आरोपी राजेंद्र बंब सध्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातून पसार झाल्यानंतर संजय बंब मालेगावमधील एका लॉजमध्ये लपून असल्याची आर्थिक गुन्हे शाखेला मिळताच बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेत त्याचा जबाब नोंदवण्यात आला. शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सुमारे सव्वासात वाजता त्याच्या अटकेची नोंद करण्यात आली. संशयित संजय बंबला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, अधिकारी हेमंत बेंडाळे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, कर्मचारी हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, राजू गिते यांच्या पथकाने आरोपीला मालेगावातून अटक केली.

संजय बंबच्या घरातही मिळाले घबाड
अवैध सावकार राजेंद्र बंबला अटक केल्यानंतर संजय पसार झाला मात्र त्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते शिवाय गत आठवड्यात संजय बंब व कुटुंबीयांच्या लॉकरमध्ये सुमारे 77 लाख 93 हजारांची रोकड, 7 लाख 51 हजारांचे सुमारे 149 ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे 490 कोरे धनादेश, 244 स्टॅम्प व एफडी मिळून आल्या होत्या.

राजेंद्र बंब कारागृहात
राजेंद्र बंब कारागृहातच आर्थिक गुन्हे शाखेनंतर आझाद नगर पोलिसांनी दोन गुन्ह्यात राजेंद्र बंबला अटक केली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याची 25 जूनला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. अन्य एका गुन्ह्याच्या तपासासाठी देवपूर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी न्यायालयात अर्ज दिला आहे.