10 लाखांची खंडणी उकळली
तळेगाव दाभाडे : महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लिल व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका विद्यार्थिनीने 10 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थिनीला तिच्या साथीदार मित्रासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथील एका महाविद्यालयात सापळा रचून गुरुवारी अटक केली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी प्राचार्य व आरोपी विद्यार्थिनी व तिचा मित्र यांची नावे ग्रामीण पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. मात्र, या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे.
मित्राच्या मदतीने व्हिडिओ
तळेगावमधील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना 1 जून 2018 रोजी एका माजी विद्यार्थिनीने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून घरी बोलावले. तिने मित्राशी संगनमत करून प्राचार्यांना घरात कोंडले. मारहाण व शिवीगाळ करून अंगावरील कपडे काढायला भाग पाडले. या विद्यार्थिनीने स्वत:सोबत अश्लिल व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून घेतला. तो व्हिडिओ प्राचार्यांच्या मित्र, नातेवाईंकांना सोशल मिडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी 9 लाख रुपये खंडणी त्यांनी प्राचार्यांकडून मिळविली.
सापळा रचून घेतले ताब्यात
उर्वरित 21 लाख रुपये देण्यासाठी पुन्हा धमकी दिली जात होती. त्याबाबत प्राचार्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आज महाविद्यालयात उर्वरित रक्कम स्वीकारण्यासाठी ही विद्यार्थिनी व तिचा मित्र येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. त्यानुसार महाविद्यालयात सापळा रचून विद्यार्थिनींसह दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, खंडणीपोटी घेतलेल्या 9 लाख रुपयांपैकी या दोघांकडून 6 लाख 20 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.