नवी दिल्ली। सध्या सोशल मीडिया हा एक प्रभावी मीडिया माध्यम समोर येत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साईटमुळे अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत, शिवाय त्याचा गैरवापरही दिसून येत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार एक काटेकोर अशी स्वतंत्र नियमावली तयार करत आहे. त्यायोगे या माध्यमांवर वापरकर्त्यांची माहिती गोपनीय राखण्यात येईल, अशी माहिती अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.
व्हॉट्सअॅप या अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या मेसेजिंग अँपने आपल्या वापरकर्त्यांची गोपनीय माहिती फेसबूकशी शेअर केल्याप्रकरणीच्या खटल्यावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी रोहतगी यांनी ही नियमावली दोन महिन्यांत तयार होईल, अशी ग्वाही देत पुढील सुनावणी दोन महिन्यांनंतर घ्यावी, अशी विनंती घटनापीठाला केली.
व्हॉट्सअॅपचे भारतात सुमारे 1 कोटी 57 लाख युझर्स आहेत. हे अँप वापरणार्या युर्झसची गोपनीय माहिती कंपनी व्यावसायिक हेतूने फेसबूकशी शेअर करत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे या 1 कोटी 57 लाख भारतीयांच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हे प्रकरण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, ही बाब धोरणात्मक निर्णय घेण्याची असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका 5 एप्रिल रोजी न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केली. त्यावरील सुनावणीदरम्यान रोहतगी यांनी दूरसंचार क्षेत्रातील सर्वोच्च नियंत्रक संस्था असलेली ट्राय समाज माध्यमांवरील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करत असल्याचे सांगितले.