अस्थायी आयुर्वेद अधिकार्‍यांचे धरणे आंदोलन

0

जळगाव। राज्यभरातील अस्थायी बीएएमएस वैद्यकिय अधिकारी यांच्यावर होत असलेल्या प्रशासकीय अत्याचाराची जाणीव करुन देण्याकरीता संपुर्ण महाराष्ट्रभर दि. 15 जुलै रोजी म. जिल्हाधिकारी कार्यालयबाहेर एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले. ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात प्रतिकुल परिस्थितीत आरोग्य सेवा देणार्‍या बीएएमएस वैद्यकिय अधिकारी यांच्या रास्त व न्याय मागण्या शासनाच्या उदासिनतेमुळे गेल्या 15 वर्षापासून आजही प्रलंबितच आहे.

अशी आहे सद्यस्थिती; मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
नागपूर येथे मागील वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात आरोग्यमंत्री यांनी सभागृहात तीन महिन्यात अस्थायी बीएएमएस वैद्यकिय अधिकार सेवा समावेशनाचा निर्णय घेतो असे आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनाची पुर्तता झालेली नाही एकीकडे महाराष्ट्र आरोग्य विभागात डॉक्टरांची कमतरता आहे व जे अस्थायी बीएएमएस वैद्यकिय अधिकारी प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत आहेत त्यांना प्रशासन व शासनाने अस्थाई पणाची वागणूक देत आहे. अस्थायीपणामुळे या सर्व वैद्यकिय अधिकार्‍यांना कुठलेच कामय शासकिय फायदे मिळत नाहीत. अस्थायी सेवा करतांना आतापर्यंत किमान 12 अस्थायी वैद्यकिय अधिकारी कामावर असतांना मृत्यू पावले. तरी त्यांना शासनाने एक रुपयाचीही आर्थिक मदत केलेली नाही. अस्थायी बीएएमएस वैद्यकिय अधिकारी यांना येत्या पावसाळी अधिवेशनात समावेशनाचा निर्णय घेण्याकरीता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून दि. 22 जुलै पासून मुंबई येथे आझाद मैदानावर संघटनेच्यावतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे. दरम्यान आंदोलनास ना.गुलाबराव पाटील, डॉ.बी.आर.पाटील यांनी भेट दिली. प्रमुख मागण्या – अस्थायी बीएएमएस वैद्यकिय अधिकारी यांना स्थायी करणे., स्थायी बीएएमएस वैद्यकिय अधिकारी गट ब यांचे गट अ वैद्यकिय अधिकारी म्हणून परिपत्रक निर्गमित करणे. आदी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.