नालेसफाईची निविदा काढल्यानंतरही टक्केवारी न दिल्याने कार्यादेश न दिल्याचा जनआधारचा आरोप
भुसावळ- अस्वच्छतेबाबतीत देशभरात झालेल्या सर्वेक्षणात भुसावळ शहराचा गतवर्षी 4 मे रोजी देशात चक्क दुसरा क्रमांक आल्यानंतर शहरवासीयांची मान शर्मेने खाली गेली आहे. या प्रकारानंतर सत्तेवर असलेल्या सत्ताधार्यांनी आत्मपरीक्षण करून शहराचे चित्र बदलवू, अशी वल्गना केली असली तरी वर्षभरानंतरही शहरातील असवच्छता कायम असल्याचा आरोप जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी शनिवारी पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केला. पावसाळ्यास महिनाभराचा विलंब असतांना शहरातील नालेसफाईला अद्यापही मुहूर्त न मिळाल्याने सत्ताधार्यांच्या एकूणच जनतेविषयी असलेल्या बेफिकिरीविषयी संताप व आश्चर्य निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले आहे. गतवर्षी नालेसफाई संदर्भात एका ठेकेदाराने अल्पदरात निविदा भरली असतांनाही केवळ टक्केवारी न मिळाल्यानेच संबंधितास कार्यादेश (ऑर्डर) देण्यात आली नसल्याचा आरोपही जनआधारने केला आहे.
नागरी सुविधांना ‘खो’ ; सत्ताधार्यांचा मलिदेवर डल्ला !
शहरातील जनतेवर दिवसागणिक करांचा बोजा वाढवला जात असतांना दुसरीकडे नागरी सुविधांना मात्र ‘खो’ देण्यात आला आहे. मर्जीतल्या ठेकेदाराला कचरा संकलनाचा ठेका देण्यात आला असून ठरावीक प्रभागातीलच कचर्याचे संकलन होत असल्याने शहरातील अनेक भागात कचर्याचे ढीग साचलेले दिसून येतात, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सत्ताधारी नागरी सुविधांना ‘खो’ देत असून केवळ मलिदा मिळणार्या कामावरच त्यांचा डोळा असल्याचा आरोप युवा कार्यकर्ते सचिन चौधरी यांच्यासह जनआधारच्या नगरसेवकांनी केला आहे. पावसाळा महिनाभराच्या उंबरठ्यावर आला असतांना नालेसफाईबाबत असलेली एकूणच बेफिकिरी संतापजनक असून आतातरी सत्ताधार्यांनी डोळे उघडावे व शहराला लागलेला कलंक पुसावा, अशी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नाले कचर्याने तुडूंब
शहरातील सर्वच भागातील नाल्यांची विदारक अवस्था आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉल तसेच कचरा ओसंडून वाहत असल्याने नाल्याकाठी राहणार्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आगाखान वाडा, मरीमाता पुल, खडका रोड, सायर मेडिकल, पंचशिल नगर परीसरातील नाल्यांमध्ये पाण्याऐवजी सर्वत्र कचरा व्यापलेला असल्याचे निवेदनात नमूद आहे.
यांची होती उपस्थिती
शहर अस्वच्छतेच्या वर्षपूर्तीनिमित्त शहरातील साचलेल्या कचर्याचा फोटो पालिका प्रशासनाचे आरोग्याधिकारी यांना देण्यात आला. याप्रसंगी युवा नेते सचिन संतोष चौधरी, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक अॅड.तुषार पाटील, दुर्गेश ठाकुर, राहुल बोरसे, सचिन अण्णा पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान 18 मे पासून रमजान महिना सुरू होत असल्याने त्यापुर्वीच नालेसफाईच्या कामांना सुरूवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.