अस्वथ करणार्‍या प्रश्‍नांचा मागोवा घेणारे पुस्तक

0

आज आपल्याला उत्तम बुद्धी, उत्तम पराक्रम, देशासाठी सर्वस्व अर्पणभाव असलेले तरुण या सुरक्षेच्या प्रश्‍नासाठी खर्च करावे लागत आहेत. ते या स्थैर्यासाठी! इथे स्थैर्य राहावे, जेणेकरून या देशातील नागरिकांनी इतर सर्व क्षेत्रांत निर्भयपणे काम करावे व आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करावा. या स्थैर्यात त्यांनी आपापल्या प्रतिभेने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, संशोधन इ. सर्व क्षेत्रांत उत्तुंग भरार्‍या घ्याव्यात व देश संपन्न आणि सुदृढ करावा. या सर्वांसाठी या समाजाला कवच पुरवण्याचे काम सुरक्षा यंत्रणा अहोरात्र करत आहेत. सीमेअंतर्गत आव्हानांसाठी फक्त सुरक्षा यंत्रणांवर जबाबदारी सोपवून आपण नागरिकांना मोकळे होता येणार नाही. दहशतवादी ना कोणत्या गणवेशात, ना कोणत्या ठराविक ठिकाणी! सामान्य नागरिकाप्रमाणे दैनंदिन जीवन जगणारा कधी दहशतवादी होईल हे सांगता येत नाही. आज महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, केरळ या राज्यांमधून उच्चशिक्षित मध्यमवर्गीय तरुण इसिस सारख्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून भारताबाहेरील जिहादमध्ये सहभागी होण्यास जात आहे. या घटना काय दर्शवितात? स्वत: ‘अ‍ॅक्शन’मध्ये नसला, तरी तो या सर्व कारवायांसाठी लागणारी सर्व स्थानिक मदत मिळवून देण्यात कधी महत्त्वाची भूमिका निभावेल ते ही सांगता येत नाही. हे तरुण कल्याणमधून थेट सीरीया, इराकपर्यंत जातात, लढतात, घरी संदेश पोहोचवतात. तामीळनाडूमध्ये भलेमोठे बोर्ड घेऊन, लाखोंची कत्तल करणार्‍या इसिसचे येथील स्थानिक तरुण समर्थन करतात. तेही विद्यापीठांमध्ये! हे कमी की काय म्हणून वर त्यांचे व्हिडीओ स्वत:च व्हायरल करतात. आमच्या लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला करणार्‍या अफजलगुरूचे समर्थन करतात. स्थानिक जनमत तयार करणे, आर्थिक मदत मिळवून देणे, उत्तम तरुण हेरणे, बाकी व्यवस्थात्मक गोष्टी पुरवणे, माहिती काढणे, पुरवणे, सोशल मीडियामधून दहशतवाद्यांबाबत सहानुभूती निर्माण करणे इ. अनेक मार्गांनी दहशतवादी कामात सहभागी होता येते व तेही रोज ‘नॉर्मल’ जीवन जगून! त्यामुळे दहशतवादाच्या बाबतीत या अप्रत्यक्ष भूमिका जास्त गंभीर आहेत.

त्यामुळे दहशतवादी हल्ल्यापासून आमचे पोलिसांनी, आर्मीने रक्षण करावे हे म्हणणे ठीकच आहे. पण मुळातच हा दहशतवाद या देशात रुजताना, वाढताना, फोफावताना आम्ही काय जबाबदारी पार पाडतो, हे पाहणे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. दहशतवाद-दहशतवाद म्हणजे तरी नक्की काय? एका दिवसात कोणी बाँब, बंदुका घेऊन हल्ला करत नाही. हल्ला ‘एका’ दिवशी घडतो. पण इतर दिवशी? इतर दिवशी दहशतवाद नसतो?…इतर दिवशीही दहशतवाद सुरूच असतो. या काळात कुठे मने तयार होत असतात, तर कुठे आरडीएक्स! या इतर दिवसांकडे आमची डोळेझाक होत असते. आम्ही अनभिज्ञ असतो. तोपर्यंत दहशतवाद, सुरक्षा, आपल्या परिसरातील हालचालींवरील लक्ष, सोशल मीडियातील खोटा, प्रक्षोभक प्रचार हे सर्व गुंडाळून ठेवलेले असतात. अशा वेळी काही जण मात्र स्वत:ची जबाबदारी म्हणून अशा विषयांकडे अखंड नजर ठेवून निरीक्षण करीत असतात. मान-अपमान गिळून अशा विषयांच्या संशोधनासाठी काही जणांचे पाय गल्ली ते दिल्लीपर्यंत फिरत असतात. या संशोधनातील ‘सत्य’, काहींचे हात धाडसी व निग्रही वृत्तीने कागदावर उतरवत असतात. अशा मोजक्या ‘काही जणांपैकी’च एक ‘श्री. विजय वाघमारे’!

एक संवेदनशील मनाचा पत्रकार. पण पत्रकार केवळ तो काम करत असलेल्या वृत्तपत्राशी बांधील नसतो, तर तो प्रथम समाजाशी बांधील असतो. हे तत्त्व जगणारा हा पत्रकार! भरपूर माहिती मिळवून आपण केवळ ‘जाणते’ नसावे; तर या माहितीचे संस्करण करून, आपल्या देशवासीयांना जागरूक करून, ‘नेणते’ करावे हे व्रत असणारा पत्रकार! व याच व्रताचा भाग म्हणून ‘सिमी’ या बंदी असलेल्या, दहशतवादी विद्यार्थी संघटनेला केंद्रबिंदू ठेवून 1999 ते 2016 या कालखंडातील भारतभर झालेल्या दहशतवादी कारवायांचा आढावा विजयरावांनी घेतला व आज तो पुस्तकरूपाने ते आपल्यासमोर मांडत आहेत. एका धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्रात उघडपणे ‘इस्लामी’ राष्ट्र स्थापण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून 400 पूर्णवेळ कार्यकर्ते (अंसार) अन् 2000 सर्वसाधारण कार्यकर्ते (इकवान) विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करतात. जळगावातील तांबापुर्यातील गल्लीत राहून काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील सक्रिय दहशतवाद्यांशी संबंध प्रस्थापित करतात. पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतात व पुन्हा भारतात येऊन निवांत बागेत फिरावे अशा पद्धतीने, थंड डोक्याने रेल्वेमध्ये बाँब ठेवून येतात. सहकुटुंब सहजपणे या राज्यातून त्या राज्यात स्थलांतर करत, भारतभर पोलिसांना चकवा देतात. पोलिसांनी पकडलेच, तर पोलिसांची पोलीस स्टेशनमधील प्राथमिक कारवाई होते ना होते, तोपर्यंत तेथे त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मोर्चे धडकलेले असतात. जबाब नोंदवायच्या वेळेपासून ते संपूर्ण खटल्याच्या कारवाईपर्यंत हे ‘भारतीय’ दहशतवादी हसत-खेळत राहतात. एखाद्याच्या घरी जाऊन पाककलेची नवीन डिश बनवावी त्या पद्धतीने बाँब बनवल्याचे सांगतात. सामान्य मध्यमवर्गीय आयुष्य जगत, खाजगी तर सोडाच; पण शासकीय सेवेतही रोजची नोकरी करत, भारताबाहेरील कुख्यात दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी करतात. त्यांचे काम भारतात वाढवतात…असे किती अन् काय काय! प्रस्तावनेतच सगळे सांगायचा मोह आवरतो; पण विजयरावांचे कौतुक यासाठीच की, मी हे पुस्तक वाचताना, ते मी वाचक म्हणून वाचतोय असे कधी वाटलेच नाही. मी स्वत:च क्राईम रिपोर्टर झाल्यासारखे वाटले. मी स्वत: ‘क्राईम’ शोधतोय, अभ्यासतोय असे वाटले. खरे तर, ‘क्राईम’ हा शब्द चुकला. दहशतवादी कारवायांना काही महाभाग ‘गुन्हा’ या श्रेणीत बघतात, याची कीव येते. खुलेआम या देशाच्या मातीशी गद्दारी करत, स्वत:च्या मागास-धार्मिक संकल्पनांसाठी माणसाच्या शरीराच्या चिंधड्या करणार्‍या या कृत्यांना ‘गुन्हा’ म्हणणे म्हणजे दहशतवादाला खूपच सौम्य केल्यासारखे वाटते. असो…

सिमीच्या दहशतवाद्यांची प्राथमिक तयारी, त्यांचे प्रवास, त्यांचे जबाब यांचे विजयरावांनी असे तपशीलात्मक वर्णन केले आहे की, आपण या दहशतवाद्यांच्या मागे-मागेच गुपचूप निरिक्षण करत फिरत आहोत, असे वाटते. दहशतवाद्यांचे अटकसत्र, न्यायालयीन कामकाज या सर्वातील पोलीसांचे अथक परिश्रम वाचताना, आपण कायम एखाद्या पोलीस अधिकार्यांच्या जीपमध्येच शेजारी बसून, दिवसरात्र प्रवास केल्यासारखे वाटते. आपला वरिष्ठ अधिकारी छापा टाकण्यासाठी वर गेला आहे व आपण खाली पहारा देत बसलोय, असाही अनुभव येतो; इतके जिवंत पुस्तक विजयरावांनी तयार केले आहे. त्याचे कारण त्यांनी संकलित केलेले ‘फर्स्ट-हॅन्ड’ पुरावे व प्रत्येक घटनेचा बारकाईने घेतलेला वेध. वाचकाने पुस्तकाची फक्त अनुक्रमणिका जरी वाचली, तरी हे पुस्तक त्याला खाली ठेवावेसे वाटणार नाही व वाचल्यानंतर त्याने ठिकठिकाणी अधोरेखित वा खुणा केलेले हे पुस्तक, दुसर्‍याला ‘हे माहितीये का?’, असे म्हणत वाचायला दिल्याशिवाय राहणार नाही. पुस्तकातील सखोल तपशील काही ठिकाणी गंभीर करतो. अंगावर काटा आणतो व वाचणार्‍या प्रत्येक भारतीयाच्या मनात असंख्य प्रश्‍न निर्माण करतो. त्या प्रश्‍नांची उत्तरे खाड्-खाड विजयरावांनाच विचारावीत असे वाटते. पण तेव्हा त्यांनी त्यांच्या मनोगतात म्हटलेल्या वाक्याची आठवणे येते. ‘मी सर्व सिमी खटला व दहशतवादी कारवाया यातील तथ्ये पोलीस व न्यायालयाच्या नोंदीनुसार एकूण एक संदर्भासहीत फक्त तुमच्यासमोर आणत आहे. विचार तुम्ही करायचाय’…म्हणून मग मनात निर्माण झालेले प्रश्‍न अस्वस्थता निर्माण करतात. ही माझी अस्वस्थता मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो व प्रस्तावनेस विराम देतो. ‘दहशतवाद’ हा प्रश्‍न हाताळताना, पोलीस अधिकारी तपासातील फक्त ‘तांत्रिकता’ व पत्रकार कारवाईतले ‘कन्टेंट’ यापलीकडे जाऊन दहशतवाद मुळात कशातून येतो, याचा विचार कधी करणार का? माणूस चंद्रावर नाही तर आता मंगळावर गेला, तरी आम्ही धर्मग्रंथांच्या चौकटीतून बाहेर येणार का? बुध्दिप्रामाण्यवाद स्वीकारून धर्मप्रामाण्यवाद सोडणार का? धर्मातल्या संकल्पनांचा असा कोणता प्रभाव पडतो, ज्यामुळे तो रक्तरंजित हिंसा तर सोडाच, आत्मघातकी हल्ले करायला तयार होतो? ‘ते’ प्रभाव टाकणारे, मानसिकता बनविणारे काहीतरी तर असणार, ते काय आहे? कोठून येते? सिमी खटल्यातील सर्व आरोपी उच्चशिक्षित आहेत. काही तर शिक्षक आहेत. दहशतवादाचा आणि कमी शिक्षणाचा संबंध जोडणारे यावरून काही शिकणार का? मानवताद्रोही, देशद्रोही वाट चालणार्‍या दहशतवाद्यांना वाट चुकलेले, भटकलेले असे म्हणत, त्यांच्याबद्दल ‘बिच्चारे-रे’ असा भाव आम्ही समाजामध्ये का निर्माण करतो? वाट चुकलेले राजकीय पक्षात जात नाहीत, जे पटले नाही त्याबाबत सुधारणा करत नाहीत. संघर्ष करत नाहीत तर थेट बाँब, बंदुका घेऊन आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी स्वत:ला जोडून घेतात; तरी आम्ही त्यांना भरकटलेले म्हणणार? आर्थिक अस्थैर्यातून तरुण दहशतवादाकडे वळतात, असेही काहींचे संशोधन आहे. अल्-कायदाच्या लादेनपासून ते जळगावातील या तरुणांपर्यंत सगळे मस्त, सुसंपन्न आहेत. इंडियन मुजाहिदीनचा पुण्यात पकडलेला अतिरेकी महंमद पिरबॉय हा पुण्यात मल्टीनॅशनल कंपनीत प्रमुख सॉफ्टवेअर इंजिनीअर होता व त्याला 19 लाख रुपयांचे पगाराचे वार्षिक पॅकेज होते. अशी केवळ भारतात हजारो उदाहरणे मिळतील. यावर मानवतावादी पोलीस अधिकारी व पत्रकारांचे काय म्हणणे आहे? देशद्रोहाला स्वच्छ व स्पष्टपणे देशद्रोह म्हटले जावे एवढी साधी अपेक्षाही आपण आपल्या देशात करू शकत नाही का? देशद्रोहाचे वास्तव मांडतांना एवढे आढेवेढे का? दहशतवादातील आरोपींना कोर्टात आणल्यावर कोर्टात दबाव कसा आणला जातो? हा दबाव आणणारी प्रचंड गर्दी कोणालाच खटकत नाही का? डझनभर प्रमुख दहशतवादी नव्हे, तर सिमीचा अध्यक्षही डॉ. शाहीद बद्र फलाही पुराव्यांअभावी निर्दोष सुटतो! चेक बाऊन्स झालेले वर्ष-वर्ष अडकतात; पण पाकिस्तानात जाऊन, सगळी कृत्ये करून, ऐनवेळी जबाब फिरवून, पंच फोडून, पुराव्यांअभावी हे निर्दोष सुटतात कसे? सिमीच्या विविध प्रकाशनांतून तरुणांना जिहादचे खाद्य पुरवले जात होते, असे समोर येऊनही आजच्या उर्दू प्रसारमाध्यमांवर पोलीस यंत्रणेचे किती लक्ष आहे? मुस्लीम समाजात मुंबई लोकल बाँबस्फोट, काश्मीरमधील वानी, नावेद अशा दहशतवाद्यांबाबत गैरसमज पसरवणार्या, किती वृत्तपत्रांवर कारवाई झाली? उघडपणे तथ्याकडे दुर्लक्ष करणार्‍या, चुकीचे वार्तांकन करून, भडकावू संपादकीय लिहून व प्रत्येक बातमीस ‘इस्लामिक’ दृष्टिकोन देणार्‍या वृत्तपत्रांवर, मासिकांवर वेळीच नियंत्रण का येत नाही? मदरशांमध्ये ब्रेनवॉश होतो असे सगळीकडे मांडले जाते, मग या मदरशांवर लक्ष कोण ठेवणार?…मदरशांना करोडो रुपयांची सरकारी अनुदाने देत आहोत. सरकारचे हे दुटप्पी धोरण नाही काय? मतपेटीच्या राजकारणाची कोणती किंमत आपण देशाला मोजायला लावत आहोत? धर्माच्या नावाखाली असेच जर सगळे अन् सारखेच होत असेल, तर ‘धर्म’-‘धर्म’ तरी काय आहे बाबा? हे आम्ही कधी पाहणार की नाही? हा ‘धर्म’ अन् हे ‘धर्माच्या नावाखाली’ ही विभागणी कोण सांगणार? धर्माच्या नावाखाली हजारो तरुण मरायला अन् मारायला तयार होत असतील, तर धर्मचिकित्सेची भूमिका कोणी घ्यावयास लावणार का? सुरक्षा यंत्रणांनी कणखर भूमिका घेत, कठोर उपाय सुचवण्यास पुढे आलेच पाहिजे. ही वेळ कधी येणार? …असो, प्रश्‍न थांबणार नाहीत, म्हणून थांबतो. पण बाँबस्फोटात जळलेल्या देहांचे, लहान-निष्पाप मुलांचे, कायमस्वरूपी अपंग झालेल्या शरीरांचे आक्रोश अन् बलिदान दिलेल्या आमच्या वीर पोलिसांचे शव पाहिल्यावर त्यांच्या नातेवाइकांचे हंबरडे कानी आदळत राहतात, ते थांबत नाहीत… शांतता काळात जास्त घाम गाळला, तर युद्धकाळात कमी रक्त सांडावे लागते, असे म्हणतात. या शांतता काळात घाम गाळून दहशतवादाचा, खुनशी चेहरा वाघमारेंनी समोर आणला. त्यांना आपण साथ देऊ. त्यांच्या प्रयत्नाने समाज जागरूक सुज्ञ झाला व रक्ताचे दोन थेंब वाचले, तरी पुस्तकाचा उद्देश सफल झाला असे वाटते.
समीर वि. दरेकर – 9970555510