लंडन: सलग 10 वर्षे सत्तेत राहिल्याने आलेल्या अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो. मात्र, 2019 मधील लोकसभा निवडणूक भाजप-संघाविरोधात सर्व विरोधी पक्ष लढणार आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या शक्तीस्थानांवर हल्ला केला गेला आहे. यामुळे भाजपला हरविणे आणि स्वायत्त संस्थांवर होत असलेले हल्ले रोखणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असेल असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी राहुल बोलत होते. यावेळी राहुल यांनी राफेल गैरव्यवहार, भ्रष्टाचार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. आम्ही भारतीय संविधानावर होत असलेल्या आक्रमनाला रोखत आहोत. मी आणि पूर्ण विरोधी पक्षांचे देशात पसरविले जात असलेले विष रोखण्यासाठीच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे. 2019 ची निवडणूक सरळ आहे. कारण भाजप- संघ विरोधात सर्व विरोधी पक्ष अशी सरळ लढाई होईल. कोणत्याही प्रकारच्या हिंसेची आपण कठोर शब्दांत निंदा करतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले.