अहमदनगर- महानगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी केली होती. यासाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, असे असतानाही राष्ट्रवादीने शिवसेनेऐवजी भाजपाला पाठींबा दिला, असा गौप्यस्फोट करत पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप केला आहे.
कदम म्हणाले, शिवसेना कधी एकदा सत्तेतून बाहेर पडते आणि आम्ही सत्तेत बसतो याची घाई राष्ट्रवादीला झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठींबा दिला आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौरपद मिळवता आले नाही.
भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अन्य अपक्षाच्या मदतीने शिवसेनेला धोबीपछाड दिला. भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. ३७ विरुद्ध शून्य मतांनी त्यांनी विजय मिळवला.
शिवसेनेचे सर्वाधिक २४ जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजपा १४, बसप ४ आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेच्या २४ पैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. आपला उमेदवार निवडून येणार नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घालण्याची खेळी खेळली.
शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे रिंगणात होते. राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण नंतर त्यांनी तो मागे घेतला. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढाई होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबत सभागृहात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला साथ देणार हे स्पष्ट झाले होते.