दोन मोबाईल जप्त ; तक्रारदारांना संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन
रावेर- दुचाकीसह सायकलवर बोलत जाणार्या नागरीकांच्या हातातून अलगदपणे दुचाकीवरून आलेल्या भामट्यांकडून मोबाईल लांबवण्याच्या घटनांमध्ये शहरात वाढ झाली होती तर 6 रोजी रात्री साडे सातच्या दरम्यान रावेर स्टेशन रोडवर पराग वाडोदकर यांचा मोबाईलही अशाच पद्धत्तीने लांबवण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईल चोरणारे चोरटे हे तालुक्यातील अहिरवाडी येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर अहिरवाडी येथील प्रदीप तायडे (22) व बिल्ला गोमाटे (22), गंभीर कोचुरे (सर्व रा.अहिरवाडी, ता.रावेर) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना 23 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रावेर पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रावेर शहर व तालुक्यातून कुणा नागरीकाचे मोबाईल लांबवण्यात आले असतील त्यांनी रावेर पोलिस ठाण्यात संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे, कॉन्स्टेबल विकास पहुरकर, भरत सोपे, जाकीर पिंजारी, सुरेश मेढ करीत आहेत.