रावेर। बहुजन क्रांती मोर्चातर्फे तहसिल कार्यालयावर विविध मागण्यांसाठी शुक्रवार 9 रोजी मोर्चा काढण्यात येणार असून यात अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीचा समावेश असल्याची माहिती जिल्ह्याचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी दिली. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या आहेत मागण्या
अनुसुचित जाती, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, मुस्लिम अल्पसंख्यांक इत्यादी समुहाच्या घटनात्मक अधिकारांची शासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. दलित, आदिवासी, भटके विमुक्त व मुस्लिम समाजावर सातत्याने होणार्या जातीय व सांप्रदायिक अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गातील जातीनिहाय जनगणना करुन त्यांच्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी हा बहुजन क्रांती मोर्चा शहरातील छोरिया मार्केटमधून 10 वाजता निघणार असल्याची माहिती मुकुंद सपकाळे यांनी दिली. यावेळी तालुका संयोजक उमेश गाढे, राजू सवर्णे, साहेबराव वानखेडे, महेंद्र गजरे, नदिमदास इंगळे, रज्जाक पहेलवान, सुरेश तायडे, सचिन अडकमोल, नितीन जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.