अॅड.रोहिणी खडसेंनी सांगितली हल्ल्याची आपबिती : म्हणाल्या पिस्टल रोखले मात्र…!
घाबरवण्यासाठी माझ्यावर हल्ला मात्र मी घाबरणार नाही ; आता आणखी जोमाने काम करणार
भुसावळ/मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा बँक संचालक अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी रात्री मानेगाव फाट्याजवळ पिस्टल व तलवारीने हल्ला करण्यात आला मात्र हल्ल्यातून अॅड.रोहिणी खडसे बचावल्या. या हल्ल्याची आपबिती त्यांनी कथन केली असून हल्ल्यामुळे आपण घाबरलेला नसून आणखी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारचा दरवाजा न उघडल्याने बचावलो
अॅड.रोहिणी म्हणाल्या की, मुक्ताईनगरकडे चारचाकीने निघाले असताना मानेगाव फाट्याजवळ तीन दुचाकीवरून सात संशयीत आले. यात तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्याच्या हातात तलवार तर तिसर्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले. एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आलेले असल्याचेही या वेळी रोहिणी खडसे म्हणाल्या. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी असून अशीच कायम उभी राहिल.
राजकीय वैमनस्यातूनच हल्ला
अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर म्हणाल्या की, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील व चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांच्यासह अन्य चार जणांनी आपल्यावर हल्ला केला. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरू असलेल्या वादानंतर राजकीय वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला आहे.