दोन वर्षांपूर्वी 11 लाख 47 हजारांची झाली होती लूट ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
मुक्ताईनगर- 500 वर्षांपूर्वीचे अॅन्टीक पीस असल्याची बतावणी करून नागपूरच्या इसमास मधापुरीत बोलावून त्यास मारहाण करीत अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 11 लाख 47 हजारांची लूट झाल्याची घटना 2016 मध्ये घडली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हाही दाखल होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी विजय कैलास सोनटक्के (30, मधापुरी, ता.मुक्ताईनगर) हा गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.
दोन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा
नागपूर येथील मोहम्मद अशपाक शेख (गांधी चौक, पाटीलपुरा) यांची आरोपी विजय सोनटक्केसह त्याच्या साथीदारांनी तब्बल 11 लाख 47 हजारांची फसवणूक केली होती. 500 वर्षांपूर्वीचे अॅन्टीक पीस देण्याच्या नावाखाली बोलावून तक्रारदारास मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिन्यांसह रोकड आरोपींनी लांबवली होती. गुन्हा घडल्यापासून आरोपी पसार होता. तो गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र बागुल, एएसआय मनोहर देशमुख, हवालदार अनिल इंगळे, रामचंद्र बोरसे, संतोष मायकल, रवींद्र पाटील, सुरज पाटील, प्रकाश महाजन, प्रवीण हिवराळे, वहिदा तडवी आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.