रोकड चोरल्यानंतर चार चोरटे कारमधून पसार; हल्ल्यात 5 जण जखमी
पुणे : लोहगाव परिसरातील अॅमेझॉन कंपनीच्या गोडाउनमधील कामगार व सुरक्षारक्षकावर हल्ला करून तीन लाखांचा मुद्देमाल व मोबाइल चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून, रोकड चोरल्यानंतर चोरटे कारमधून पसार झाले. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ शिंदे (22, रा. वडगावशेरी) यांनी तक्रार दिली आहे. या हल्ल्यात सौरभ शिंदे, कामगार पवन प्रकाश तायडे, वैभव राजाराम बोदडे, शुभम सुभाष म्हात्रे, सुरक्षारक्षक महेंद्र मााणिकराव भालेराव जखमी झाले आहेत.
लोहगाव येथील पवार वस्ती परिसरात अॅमेझॉन कंपनीचे गोडाउन आहे. या ठिकाणी ऑनलाइन मागविलेल्या वस्तू ठेवण्यात येतात. माल पाठविल्यानंतर मिळालेले पैसे रात्री मुले येऊन या ठिकाणी जमा करतात. या गोडाउनमध्ये सौरभ शिंदे हे रात्रपाळीचे प्रमुख म्हणून काम पहातात. गुरुवारी रात्री सुरक्षारक्षकासह शिंदे व इतर कामगार काम करत होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या चार जणांनी गोडाउनमध्ये प्रवेश करून लोखंडी रॉड व चॉपरने धाक दाखवून त्यांनी शिंदे व तायडे यांना मारहाण केली. गोडाउनमधील लोखंडी कपाट रॉडने तोडून, तीन लॅपटॉपची तोडफोड केली. यानंतर तिजोरीत ठेवलेली तीन लाखांची रोकड, दोन मोबाइल असा एकूण तीन लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून कारमधून पळून गेले. चोरट्यांनी कार वाटेत सोडून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून, आरोपींचा शोध घेत आहेत.