मेलबर्न । ऑस्ट्रेलियाच्या संघातील अनेक प्रमुख वेगवान गोलंदाज आधीपासूनच जायबंदी आहेत. मायदेशात रंगणार्या अॅशेस मालिकेच्या पार्श्वभूमीवर गोलंदाज पॅट कमिंसला भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. अॅशेस मालिकेसाठी कंमिस तंदुरुस्त असावा या भूमिकेतून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील नागपूरमध्ये 1 ऑक्टोबर रोजी होणारा शेवटचा सामना झाल्यावर कमिंस मायदेशी परतणार आहे. दुखापतीमुळे दीर्घ काळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर कमिंसने पुनरागमन केले आहे. यावर्षी तो अनेक सामने खेळला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख ट्रॅवर हाँस म्हणाले की, मैदानात परतल्यानंतर शरिराने कमिंसला चांगली साथ दिली आहे. अॅशेस मालिकेआधी तंदुरुस्त राहण्यासाठी त्याला विश्रांतीची गरज आहे. याशिवाय त्याला शेफिल्ड शिल्ड स्पर्धेसाठी चांगली तयारी करता येईल. सध्या कमिंसने सर्व लक्श 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेच्या तयारीवर केंद्रित केले आहे. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिंसच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी 20 सामन्याची मालिका 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दुसरा टी 20 सामना गुवाहटीमध्ये 10 ऑख्टोबर रोजी आणि तिसरा सामना 13 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. अॅशेस मालिकेत पॅट कमिंस ऑस्ट्रेलियाचा प्रमूख गोलंदाज असणार आहे. याशिवाय मिशेल स्टार्क, जेम्स पॅटीसन आणि जोश हेजलवुडही संघात असतील.