यवत । पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस-कुरकुंभ घाटामध्ये मोबाईल नेटवर्क कंपनीच्या ऑप्टिकल फायबर वायर कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे महावितरण, बी.एस.एन.एल.च्या खांबावरून आणि वनखात्याच्या जागेमधून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे महावितरण आणि बीएसएनएलच्या खांबांची परिस्थिती गंभीर झाली आहे. तसेच येथील वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे,मोबाईल नेटवर्कच्या टॉवरचा संपर्क इतर टॉवरशी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑप्टिकल फायबर वायरचा उपयोग केला जातो. या फायबर वायरचे जाळे संपूर्ण देशात पसरलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाच्या काही अंतरावरून ही फायबर वायर भूमीगत घेतली जाते. त्यानंतर दोन टॉवर एकमेकांना जोडले जातात. वायर भूमिगत घेताना मोबाईल कंपनीला संबंधीत जमीन मालकांची आणि संबंधित खात्यामधील अधिकार्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. पण काही नेटवर्क कंपन्या पूर्व परवानगी न घेताच हे काम करत आहेत. या कंपन्यांची फायबर वायर रस्त्याच्या काही मीटर बाजूने भूमीगत घेण्यात आली आहे. या फायबर वायरमध्ये अडचणी निर्माण झाल्यावर अनेक ठिकाणी तीन ते चार फूट खोल खड्डे खोदून माती रस्त्यावर टाकली जात आहेत. यामुळे रस्त्याच्या बाजूला अनेक खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
खांबांची अवस्था बिकट
पाटस हद्दीमधील कुरकुंभ घाट डोंगराळ आहे. या महामार्गालगत विद्युत महावितरण आणि बीएसएनलचे मोठ्या प्रमाणात खांब असल्याने या कंपन्यांनी या खांबाचा वापर केला आहे. या खांबांवर विद्युत तारा कमी पण फायबर वायर अधिक झाल्या आहेत. यांच्या ताणामुळे हे खांब वाकडे झाले आहेत. भविष्यकाळात हे खांब लवकरच जमीनदोस्त होतील. महावितरणचे खांब जमीनदोस्त झाल्याने मोठ्या अपघाताची शक्यता आहे. या खांबांची अवस्था बिकट झाल्याने काही अंतरावर असलेल्या औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी लोखंडी पाईप लाईन आणि पुणे-सोलापूर महामार्गावरून ये-जा करणार्यांना धोका निर्माण झाला आहे.
कारवाईचा इशारा
महावितरणचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मोबाईल कंपनीकडून संबंधित कर्मचार्यांची मर्जी राखली जात असल्याने असे प्रकार घडत असतील असे सांगितले जाते. दौंड यविभागाचे विद्युत महावितरण कंपनीचे व्यवस्थापक भोंगळे यांना विचारले असता संबंधित मोबाईल कंपनीने महावितरणची परवानगी घेतली नाही, तसेच महावितरणच्या खांबावरील फायबर वायर कोणत्या कंपनीच्या आहेत, याची चौकशी करून संबंधित कंपन्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.
तारा उघड्यावर
कुरकुंभ घाटामध्ये मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक प्रकारचे वन्यप्राणी निवास करतात. या वनखात्याच्या जागेची देखभाल करण्याची जबाबदारी वनरक्षक सचिन सकपाळ यांच्याकडे आहे. येथील खाजगी जमिनीवर मोबाईल कंपनीच्या तारा उघड्यावरच असल्याने वन्य प्राण्यांनाही याचा त्रास होत असल्याचे वन्य प्रेमिंनी सांगितले. याबाबत सकपाळ यांना विचारे असता घडलेल्या सर्व प्रकाराबाबत माहिती नसल्याचे सांगितले. तसेच संबंधित सर्व मोबाईल कंपन्यांच्या परवानगीबाबत सांगता येत नाही, असे सांगितले. तसेच काही ठिकाणी महावितरणच्या खांबावरून या तारा गेल्या आहेत, तेथील पाहणी करून कारवाई केली जाई, असे त्यांनी सांगितले.
खर्च टाळण्यासाठी खांबांचा वापर
पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी डोंगर भाग आहे. वायरी भूमिगत करण्यासाठी खूप खर्च येत असल्याने अनेक कंपन्या भूमिगत काम करत नाहीत. बाजार पेठेमध्ये मोबाईल नेटवर्कच्या अनेक कंपन्या असल्याने सर्व कंपन्या आपल्या फायबर वायर भूमिगत न करता महावितरण आणि बी.एस.एन.एल.च्या जुन्या खांबांचा आधार घेऊन फिरवल्या जातात. या खांबांचा बेकायदेशीररित्या वापर करताना त्या दिसत आहेत. या भागामधील अनेक बीएसएनएलचे खांब चोरीला गेले आहेत. तर काही खांबांची परिस्थिती गंभीर आहे. तरी संबंधित बीएसएनएल अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. जर अशीच परिस्थिती राहिली तर बीएसएनएलचे सर्व खांब चोरीला गेल्याशिवाय राहणार नाहीत.