आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात इंदापूर महाविद्यालय प्रथम

0

इंदापूर : आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये इंदापूर महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळवत फिरता चषक पटकावला. याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे पुणे जिल्हा समन्वयक प्रा. बाळासाहेब काळे यांनी दिली.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व इंदापुरातील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धांचे आयोजन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे करण्यात आले होते. इंदापूर, बारामती, दौंड, कर्जत आणि जामखेड या पाच तालुक्यातील 37 महाविद्यालयांच्या 578 विद्यार्थ्यांनी युवक महोत्सवात सहभाग घेतला होता. संगीत, नृत्य, ललित कला, नाटक, साहित्यिक या पाच विभागातील एकूण 24 कला प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक सोमेश्‍वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालय तर बारामतीतील टी. सी. महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. तर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला.