नवी दिल्ली । राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णविजेता मुष्टियोद्धा मनोज कुमारने बँकॉकमध्ये सुरू असलेल्या थायलंड आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेतून विकास कृष्णन व शिवा थापा, देवेंद्रो सिंग यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. मनोजने 69 किलो वजन गटात व्हिएतनामच्या हयुन्ह एन्गॉक व्हिएनचा पराभव करून शेवटच्या आठमध्ये प्रवेश मिळविला. मनोजप्रमाणे रोहित टोकास (64 किलो) व के. शाम कुमार (49) यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाच्या मुहम्मद डेमिरकायाचा तर शाम कुमारने स्थानिक बॉक्सर थानी नरिनरामवर विजय मिळविला.
रोहित व शाम हे या स्पर्धेतील माजी पदकविजेते असून त्यांनी 2015 मध्ये अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक मिळविले होते. मात्र माजी आशियाई चॅम्पियन शिवा थापा (60 किलो गट) थायलंडच्या सोन्चय वाँगसुवानकडून पराभूत झाला. या लढतीवेळी त्याच्या डोळयावर जखम झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्याप्रमाणे विकासलाही (75 किलो) पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर तो प्रथमच स्पर्धेत खेळत होता. कझाकच्या अल्झानोव्ह येरिकने त्याला पराभूत केले. याशिवाय राष्ट्रकुल रौप्यजेता एल. देवेंदो सिंग (52 किलो) याचे आव्हानही पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला क्मयुबाच्या फ्रँक झाल्दिवर सँटिस्टेबानने हरविले. बँटमवेट गटात मोहम्मद हुसामुद्दिनला फिलिपिन्सच्या फर्नांडेझ मारिओने हरविले. आता पुढच्या फेरीत मनोजकुमारकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.