इंदापूर । दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्याच्या कुरवली येथील अभिजीत सावंत या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला असून उत्कृष्ट खेळाडू पुरस्कारावरही नाव कोरले. या यशाबद्दल इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास माने, माजी उपसरपंच अंबादास कवळे, कर्मयोगी विद्यालयाचे प्राचार्य गणेश घोरपडे, पैलवान नितीन माने आणि ग्रामस्थांनी अभिजीतचे कौतुक केले.
या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत भारत, दुबई, फिलिपाइन्स, नेपाळ अशा विविध देशातील स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 8 ते 14 वयोगटात अभिजीत सावंत व मिलींद गाडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकविला. त्याचबरोबर 14 ते 18 या वयोगटात गौरव शेंडे व प्रथमेश काटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संस्थापक आण्णासाहेब डांगे, चिमण डांगे, सुनील शिनगारे, सुभाष पाटील, महेश जाधव, क्रीडा मार्गदर्शक परेश पाटील, योगा शिक्षक सुशांत घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
परदेशात मिळवला नावलौकीक
अभिजीतला योगासनांबद्दल आकर्षण होते. त्यामुळे तो खडतर परिश्रम व नियमीत सराव करत राहीला. खडतर कष्टामुळेच त्याने हे यश संपादन केले आहे. यापूर्वीही त्याने योगासनांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार पटकाविले आहेत. विद्यार्थ्यांना योग्य व परिपूर्ण मार्गदर्शन मिळाल्यामुळे देश-परदेशात विद्यालयाचा तसेच विद्यार्थ्यांचा नावलौकीक उंचावला आहे, असे क्रीडा शिक्षक सुशांत घोरपडे याने सांगितले.