आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणार्‍यांमध्ये घट

0

पुणे : परदेशात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज भासते. ही प्रक्रिया दीड वर्षापूर्वी ऑनलाइन केली. तरीही परवाना काढणार्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्यावर्षी 2 हजार 955 नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला होता, मात्र यंदा हे प्रमाण 1 हजार 776 इतके खाली आले आहे.

नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी परदेशात राहणार्‍या भारतीयांची संख्या मोठी असून अशा नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. यासाठी देशातील ज्या ठिकाणी ती व्यक्ती राहायला आहे, तेथील आरटीओकडून संबंधित व्यक्तीला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. 2018 पूर्वी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे जमा करून (मॅन्युअल) ही प्रक्रिया होत असे. त्यामुळे त्याला विलंब होत होता. म्हणून 2018 पासून ही प्रक्रिया ऑनलाइन केली. त्यानुसार अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे अपलोड करावी लागतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला मूळ कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष पडताळणीसाठी आरटीओत जावे लागते. कागदपत्रांची तपासणी करून एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत यंदा वाहन परवाना घेणार्‍यांची संख्या कमी झाली आहे.

ऑनलाइन प्रणाली सुरू

आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आम्ही ऑनलाइन प्रणाली सुरू केली. त्यामुळे घरबसल्या परवाना काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, परदेशात जाणार्‍यांची संख्या न वाढल्याने परवाने काढणार्‍यांची संख्या घटली आहे. बाबासाहेब आजरी,प्रादेशिक परिवहन अधिकारी