नारायणगाव । आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार, जिद्द व सतत प्रयत्न करावेत. तुमचे मन, मेंदू व मनगट सक्षम तयार करावे, असे एसएससी व एचएससी पुणे बोर्डाचे विभागीय सचिव बी. के. दहिफळे यांनी सांगितले. नारायण गावातील गुंजाळवाडी येथील ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
ध्येयपूर्तीसाठी परिश्रम करा
मुलांनी आपले आरोग्य चांगले राखावे, ध्येय गाठायचे असेल तर कोणत्याही परिश्रमाला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे, असे दहिफळे यांनी पुढे सांगितले. भविष्यात शाळेतील एखादा शास्त्रज्ञ किंवा ऑलंपिक खेळाडू तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कृषीभूषण अनिलतात्या मेहेर व शाळा समितीचे सदस्य मंगलदास सोलाट यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ. श्रीकात विद्वांस, प्रकाश पाटे, अरविंद मेहेर, डी. एल. गाडगे, विकास दरेककर, एच. पी. नरसुडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए. पी. नरसुडे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिल वाव्हळ, पारितोषिक अहवाल वाचन अजय कानडे तर आभार दत्तात्रय वाबळे यांनी मानले.