आंदोलक दलित तरुणाची मेरठमध्ये हत्या!

0

मेरठ । भारत बंदमध्ये सामील झाला म्हणून मेरठच्या शोभापूरमध्ये 28 वर्षांच्या दलित तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून, भीतीपोटी बाकी तरुणांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेरठच्या शोभापूरमधील ही घटना असून आणखी 83 तरुणांची हत्या करण्यासाठी यादी तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या तरुण आंदोलकांविरोधात उच्चवर्णीयांकडून बदला घेतला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या यादीतील पहिले नांव गोपी परिया (28) या बसप कार्यकर्त्यांचे होते. ही यादी तयार कोणी केली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

गोपीचे वडील ताराचंद हेही बसपचे नेते असून, त्यांच्या तक्रारीवरून शोभापूरमधील मनोज गुज्जर, आशिष गुज्जर, कपिल राणा आणि गिरिधारी या चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी गोपीच्या शेजारी राहणारे मनोज आणि कपिल यांना अटक करण्यात आली आहे. ही यादी समाजमाध्यमावरून फिरवण्यात आली. यादीत नाव असल्याचे पाहिल्यानंतर अन्य दलितयुवक पसार झाले. गोपी मात्र इतरांबोरबर जाण्यास नकार दिला व तो वस्तीतच राहिला. त्याची जबर किंमत मोजावी लागली, असे त्याचे वडील ताराचंद यांनी सांगितले. मेरठमध्ये चार दिवसांपूर्वी दलितांचे प्राबल्य असलेल्या शोभापूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला त्यावेळी पोलीस तपासणी नाक्याला आग लावण्यात आली होती. बुधवारपर्यंत बहुसंख्य दलितांनी परिसर सोडला होता, असे ताराचंद यांनी सांगितले.