उरण । उरणच्या भेंडखळ गाव ते बीपीसीएल आणि जीटीपीएस ते बीपीसीएल मार्गावरची गॅस टँकर आणि गॅस सिलेंडर गाड्यांची अनधिकृत पार्किग हटविली जात नसल्याने उरण सामाजिक संस्थेने 21 नोव्हेंबरपासून सनदशीर आंदोलनाची नोटीस बजावली आहे. या केवळ नोटीसचा परिणाम म्हणून या मार्गावर आज एकही वाहन पार्किंग केलेले आढळून आले नाही. उलट सिडकोच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन रक्षक या मार्गावर वाहने पार्कीग होणार नाहीत यावर करडी नजर ठेवून असल्याचे आढळून आले. त्यामुळे आंदोलनाची धमकी देताच वाहतूक पोलीस, सिडको आणि बीपीसीएल या तीनही आस्थापणा ताळ्यावर आले आहेत.
जनआंदोलनाची दिली होती हाक
1 अनधिकृत पार्किंगमुळे या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामध्ये शाळकरी मुले, रिक्षाचालक, छोटे वाहनधारक, दुचाकीस्वार, छोटे कारचालकांना हा प्रवास करताना नकोसा वाटत होता. याबाबत उरण सामाजिक संस्थ्येने देखील मागील दोन वर्षांपासून हा विषय लावून धरला आहे.
2 विशेष म्हणजे भेंडखळ गाव ते बीपीसीएल आणि जीटीपीएस ते बीपीसीएल मार्गावरची गॅस टँकर आणि गॅस सिलेंडर गाड्यांची अनधिकृत पार्कीग ज्या सिडकोच्या मालकीच्या रस्त्यावर थाटली गेली आहे. त्या सिडकोला देखील काही देणे घेणे नसल्याचाच प्रत्यय सातत्याने येत होता.
3 त्यामुळे सुमारे अठरा वेळा विविध स्तरावर पत्रव्यवहार केलेल्या उरण सामाजिक संस्थेने आता शेवटचे हत्यार म्हणून या अनधिकृत पार्कीग विरोधात थेट जनआंदोलनाची हाक दिली असून या आंदोलनाच्या जनजागरण संभावना देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे.
प्रशासनाने घेतली दखल
प्रशासनाने या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष आंदोलनाला आता चार दिवस उरलेले असताना सिडको, वाहतूक पोलीस, उरण पोलीस आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठांनी या आंदोलनाची धास्ती घेतली असून गुरुवारी दिवसभर या मार्गावर एकही गाडी उभी राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे आंदोलनाचे उपसले गेलेले हत्यार उरण पोलीस, वाहतूक पोलीस आणि सिडको व बीपीसीएल प्रशासनाच्या अगदी वर्मी बसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.