मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंबई :– राज्यातील कंत्राटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बंगल्यावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ५ हजारांपेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले असून एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या या कर्मचाऱ्यांना अटक करणे शक्य नसल्याने त्यांची जिथे सापडतील त्या ठिकाणावरून धरपकड करून त्यांना आझाद मैदानात सोडण्यात आले. वर्षा बंगल्यावर कोणीही जाऊ नये, याची दक्षता पोलीस घेत आहेत.
शासकीय सेवेत रिक्त पदावर कायम करा, या मागणीसाठी वर्षावर हजारो कंत्राटी कर्मचारी धडकणार आहेत. त्यामुळे बंगल्याच्या चोहीकडे पोलिसांनी गराडा घातला आहे. आपल्या मागण्यांच्या संदर्भात राज्यातील अनेक जिल्ह्यांसह मुंबईतील आझाद मैदानावर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी न घेतल्याने हे आंदोलक सोमवारी वर्षावर धडकणार होते. पहाटेपासूनच हजारो लोक बस आणि रेल्वे स्थानकांवर दाखल झाले आहेत. बस स्थानक आणि रेल्वे स्थानकांवरच या कंत्राटी कर्मचाऱ्यांची धरपकड करण्यात येत असल्याचे चित्र होते. आंदोलनासाठी कर्मचारी दिसताच त्यांना पकडून आझाद मैदानावर सोडण्यात येत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.