आंध्रप्रदेश सरकारने सिंधूच्या क्लास वन नोकरीसाठी बदलला कायदा!

0

अमरावती । भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक जिंकून देणार्‍या बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला राज्य सेवेत सामावून घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने कायद्यात बदल केला आहे. सिंधूला आंध्र सरकारमध्ये क्लास वन नोकरी देण्यासाठी आंध्र लोकसेवा आयोग कायद्यातील दुरुस्तीस राज्य विधिमंडळाने परवानगी दिली. आंध्र शासनाच्या 1994 च्या कायद्यानुसार राज्य शासनात ‘अ’ वर्ग नोकरी देताना उमेदवाराची निवड आंध्र लोकसेवा आयोगाची निवड समिती किंवा सेवायोजन कार्यालयाद्वारे करण्याची तरतूद होती. या कायद्यात दुरुस्ती करीत अत्युच्य कामगिरी करणारे बॅडमिंटन खेळाडू यास अपवाद असतील, असा बदल सुचविण्यात आला आहे.

सिंधू आता राजपत्रित अधिकारी
सिंधू आता यामुळे आंध्रप्रदेशची राजपत्रिक अधिकारी म्हणून काम पाहील. वास्तविक, आंध्र प्रदेशच्या नागरी सेवा कायद्यातील तरतुदीनुसार, राज्यातील कोणतीही शासकीय नियुक्ती आंध्र प्रदेश नागरी सेवा आयोग, निवड समिती किंवा रोजगार योजनेच्या माध्यमातूनच होणे क्रमप्राप्त होते. पण, राज्य सरकारने सिंधूला महसूल विभागीय अधिकारी म्हणून नियुक्त देण्यासाठी यात आवश्यकतेनुसार बदल केले गेले. प्रारंभी, या बदलाचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. तेथे तो एकमताने मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेतही त्यावर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सिंधूच्या नियुक्तीची घोषणा करत तिला आपले सरकार राज्याची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नेमण्यासाठी विचाराधीन असल्याचेही नमूद केले.

थायलंड ओपन स्पर्धेसाठी विश्रांती
थायलंड ओपन स्पर्धेसाठी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी थायलंड, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारत पूर्ण ताकदीचा संघ पाठवणार आहे. थायलंड ओपन 30 मे, इंडोनेशिया ओपन 12 जून आणि ऑस्ट्रेलिया ओपन 20 जूनपासून सुरू होणार आहे. या तीनही स्पर्धांसाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा केली. सिंधूच्या गैरहजेरीत साईना थायलंडमध्ये दुसरे विजेतेपद मिळविण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी 2012 मध्ये तिने ही स्पर्धा जिंकली होती.