आंध्रमध्ये कालव्यात बस पडून 8 ठार

0

विशाखापट्टणम । आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मुल्लापाडूनजीक असलेल्या कालव्यामध्ये बस पडून 8 जण ठार, तर 30 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 5.30 वाजता हा अपघात झाला. दिवाकर ट्रॅव्हल्सची भुवनेश्‍वरवरून सुटलेली ही बस एका पूलावरून जात असताना उलटली आणि कालव्यात कोसळली. बसमध्ये एकूण 38 प्रवासी होते. त्यापैकी 10 जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना विजयवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गॅसकटरचा वापर करून बसमधील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.

बसचा चालक आदिनारायण स्वामी याला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. विजयवाडा येथे या बसचा चालक बदली झाला होता. भुवनेश्‍वरहून हैदराबादला निघालेल्या या बसने सुमारे 1 हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. दिवाकर ट्रॅव्हल्स बस कंपनी ही तेलगु देसम पक्षाचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांच्या मालकीची आहे. या बसमधील प्रवासी प्रामुख्याने विशाखापट्टणम, भुवनेश्‍वर, श्रीकुलम आणि हैदराबाद येथील होते. आंध्र प्रदेशचे उप-मुख्यमंत्री एन. सी. राजप्पा यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.