म्हसळा । ओखी वादळाच्या तडाख्यामुळे म्हसळा तालुक्यात नुकताच मोहर आलेला आंबा व काजू कलम गळला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हसळा तालुक्यात आंबा-काजूसोबत अनेक ठिकाणी आवरा, पावटा, तूर यांचेही पिक बर्याच प्रमाणात घेतले जाते. त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे. तालुक्यात पावसामुळे विटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ओखी वादळाने नागोठणे शहरासह विभागात पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा तसेच काजू पिकाला मोहर गळल्यामुळे धोका उत्पन्न झाला असतानाच वाल, पावटा, तूर, मूग, चवळी या कडधान्यांचे पीक हातातून जायची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
अंबानी शाळा सुरूच
शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरासह विभागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, येथील रिलायन्स कंपनीची जे.एच.अंबानी शाळा सोमवारी सुरुच ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या शाळेत रिलायन्स निवासी संकुलातील अधिकारी, कर्मचार्यांच्या मुलांसह नागोठणे, पाली तसेच विभागातील पंधरा-वीस गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
अंबानी शाळा सुरू असल्याबाबत रोहे पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी सादुराम बांगारे यांच्याकडे विचारणा केली असता, सर्व शाळांबरोबर अंबानी शाळेलासुद्धा शाळा बंद ठेवणेबाबतचा संदेश देण्यात आला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हालासुद्धा तसा आदेश होता. मात्र, आम्ही शाळा सुरूच ठेवली आहे असे अंबानी शाळेकडून सांगण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता, शाळा बंद ठेवणे बंधनकारक नव्हते असे सांगण्यात आले तसेच त्यांनी आधिक माहिती देण्यास नकार दिला.