त्यांनी नेहमीच दलित चळवळीने घेतलेल्या राजकीय भूमिकांना पाठिंबा दिला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी, त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या, समतेच्या लढ्याशी त्यांची लेखणी कायम एकनिष्ठ राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकारला जावा ही त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचे ऐक्य व्हावे यासाठी ते नुकतेच मुंबईत विचारवंतांच्या बैठकीला उपस्थितही राहिले होते.
ज्येष्ठ दलित साहित्यिक, अस्मिता दर्श नियतकालिकाचे संपादक, परिवर्तन साहित्य महामंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक सदस्य गंगाधर पानतावणेे यांचे नुकतेच निधन झाले. माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 1994-95च्या काळात पानतावणे सरांचा माझा पहिला संबंध आला. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारचे राज्य होते. त्यामध्ये रामदास आठवले समाजकल्याण मंत्री होते. त्यावेळी त्यांनी परिवर्तन साहित्य महामंडळाची स्थापना केली. डॉ. गंगाधर पानतावणे सर, पद्मश्री दया पवार, वामन होवाळ, अशी मंडळी त्यावेळी एकत्र करून त्यांनी साहित्य संमेलन घेतले होते. त्यानिमित्ताने या मंडळींच्या मी अधिकच जवळ गेलो. तेव्हा मी वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायचो. तेथे पानतावणे सर यायचे. तेव्हापासूनच मला त्यांच्याबद्दल एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून आकर्षण आणि आदर होता. तेव्हापासून मी त्यांना आणि दलित चळवळीला जवळून पाहत आलो.
त्यांनी नेहमीच दलित चळवळीने घेतलेल्या राजकीय भूमिकांना पाठिंबा दिला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी, त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या, समतेच्या लढ्याशी त्यांची लेखणी कायम एकनिष्ठ राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकारला जावा ही त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचे ऐक्य व्हावे यासाठी ते नुकतेच मुंबईत विचारवंतांच्या बैठकीला उपस्थितही राहिले होते. रिपब्लिकन पक्षाचे ते क्रियाशील सदस्य होते. त्यांचा आंबेडकरी साहित्याचा प्रचंड अभ्यास होता. दलित साहित्य म्हणजे बोधीवृक्षावरून देशभरात घोंगावलेले विचारांचे मोहोळ आहे. ती स्वातंत्र्याची घोषणा आहे, असे म्हणत या घोषणेला दूरदूरपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवले. नुकताच त्यांना पद्मश्री हा देशाचा नागरी सन्मान जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी त्यांनी आजारपणातून लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा त्यांचे लाखो चाहते करत होते. पण ते घडायचे नव्हते. घरातच झालेल्या एका लहानशा अपघाताचे निमित्त होऊन ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. गेले अर्धशतक ते अस्मितादर्श नियतकालिकाच्या माध्यमातून दलित साहित्य आणि साहित्यिक यांना घडवण्याचे काम करत होते. त्यातून हजारो साहित्यिक घडले, नावारूपाला आले. एक प्रकारे ‘अस्मितादर्श’ ही एक चळवळ बनली. या चळवळीचे नेतृत्व करणे तुलनेने सोपे असेलही, पण ही चळवळ जिवंत ठेवणे हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण काम त्यांनी अनंत अडचणींवर मात करत विनातक्रार केले. म्हणूनच 50 वर्षांचा दीर्घ टप्पा हे वाङ्मयीन नियतकालिक आजच्या काळात पूर्ण करू शकले. तथाकथित हस्तीदंती मनोर्यात बसणार्या संस्कृती रक्षकांनी दलित साहित्याला शिवराळ ठरले, आक्रस्ताळे वाङ्मय अशी संभावना केली.
मात्र, या अभिव्यक्तीला त्यातील उद्वेगासह समजून घेऊन त्या साहित्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन करण्याचे काम डॉ. पानतावणे यांनी समर्थपणे केले. आंबेडकरी साहित्याची मांडणी अन्य विचारांच्या व्यासपीठावर जाऊनही केली पाहिजे, अशा मताचे ते होते. दलित साहित्य ही सांस्कृतिक क्रांतीची परिभाषा आहे, असे ते म्हणत. दलितांच्या क्रांतीची ही परिभाषा इतरांनाही समजली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने होणार्या समरसता मंच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही ते गेले होते. त्यांच्या तिथे जाण्याने त्यांना आपल्याच सहकार्यांच्या टीकेचे लक्ष्यही व्हावे लागले होते. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दलाल म्हणण्यापर्यंत त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर चिखलफेक केली. मात्र, त्यांनी आपली भूमिका कधी बदलली नाही. अशा निष्ठेने एखादी चळवळ चालवणार्यांची संख्या नेहमीच कमी असते. ते अत्यंत निग्रही होते. खासकरून 1965 नंतर दलित समाजात जी स्तित्यंतरे झाली. त्यातून जे साहित्यिकांची मोठी फळी निर्माण झाली. लिटल मॅगझिन्सची चळवळ उभी राहिली, त्या चळवळीचे तेही एक खंदे आधारवड होते. नामदेव ढसाळ, दि. पू. चित्रे, राजा ढाले, दया पवार यांच्या कालखंडातील डॉ. पानतावणे हे एक नाव. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात त्यांनी पँथर चळवळीच्या ऐनभरात आपले योगदान दिले होते. त्यांची देशभरातच नाही, तर विदेशातही ख्याती होती. बाबासाहेबांच्याच प्रेरणेने दलित, शोषितांमध्ये पेटलेले लेखनाचे स्फुल्लिंग सतत पेटत राहिले पाहिजे, ही त्यांची धारणा होती. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाची सुरुवात केली. अस्मितादर्श म्हणजे स्वत्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे, अशी त्यांची भूमिका होती. दलित चळवळीचे मुखपत्र म्हणूनही ते या नियतकालिकाकडे पाहत होते. ते नियतकालिक सुरू राहावे यासाठी अमेरिका, इंग्लंड, जपान या देशातूनही त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आर्थिक मदत पाठवली होती. पानतावणे सरांच्या जाण्याने खरेच आंबेडकरी विचारांचे नुकसान झाले आहे.
– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111