रायगड-राहुरी कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातप्रकरणी जवळपास सहा महिन्यांनी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला होता, या भीषण दुर्घटनेप्रकरणी मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत बसचालक प्रशांत भांबेड यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. २८ जुलै २०१८ रोजी पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. बस आंबेनळी घाटात कोसळून विद्यापीठाचे ३० कर्मचारी जागीच ठार झाले होते. तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते.
बसचालक प्रशांत भांबेड हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एम एच ०८ ई ९०८७) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होते. प्रशांत भांबेड यांनी निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.