आंबेहोळला घराची भिंत फोडून लांबवले सोन्या-चांदीचे दागिने

चाळीसगाव : चोरीसाठी चोरटे नेहमीच विविध शक्कल लढवतात. असाच प्रकार चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे उघड झाला आहे. चोरट्यांनी चोरीसाठी चक्क भिंतच फोडली असून एक लाखांचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीसाठी फोडली घराची भिंत
चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथील रहिवासी विठ्ठल हंसराज चव्हाण (35) यांच्या घराची भिंत शुक्रवार, 9 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडली. घरातून चोरट्यांनी कानातील सोन्याच्या दोन रींग, हातातील चांदीचे कडे, 60 हजारांची रोकड मिळून एक लाखांचा ऐवज लांबवला.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
या प्रकरणी विठ्ठल हंसराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहेत.