जळगाव । आयुष्याच्या आजवरच्या प्रवासात मागे वळून पाहिले तर माझा आजवरचा प्रवास हा अत्यंत सुकर झाला आहे. आयुष्यात उभ्या ठाकणार्या संकटांना, आव्हानांना परतवून लावण्याचा आत्मविश्वास, बळ आईने केलेल्या सुसंस्कारातून मिळाले. आईमुळेच सार्वजनिक, सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालो असे भावोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाला आणि नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार मराठी रंगभूमीत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या डॉ. जब्बार पटेल यांना डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, नाटके, चित्रपट केल्यानंतर अनेक वर्षांपासून जब्बार पटेल काय करतो, असा अनेकांना प्रश्न पडलेला असेल. मात्र लवकरच मी रंगभूमीवर पर्दापण करत असून युवावर्गाला इतिहास माहिती होण्यासाठी जूने आणि नवीन नाटके घेऊन येत असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले.
मराठवाड्यातील संतांची भूमी वेगळीच
विचारमंचावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कवी ना. धों. महानोर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. दिलीप घारे, किरण सागर, अनिल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा, रंगभूमीवर भाष्य करताना पवार म्हणाले की, मराठी भाषा ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी आहे. मुंबईतील मराठी भाषेत सर्व देशातील भाषांचे मिश्रण पाहायला मिळते. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भ, मराठवाड्यातील मराठी भाषेचे विभागानुसार वेगळेपण आढळते. या सर्वांमध्ये मराठवाड्यातील संतांची भूमी वेगळीच आहे. या भूमीत प्रेमाचा ओलावा जाणवतो याची प्रचीती अनेक वेळा आलेली आहे. यामुळे मराठा साहित्य परिषदेने दिलेल्या पुरस्काराचे मोल असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.