आईमुळेच समाजात चांगली माणसे घडतात

0

देहूरोड (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज महान राजे म्हणून ओळखले जातात, तसेच ते एक चांगला माणूस म्हणूनही ओळखले जातात. त्याचे सारे श्रेय त्यांच्या आईला जाते. अनेक महान व्यक्तींच्या जडणघडणीत आईचे मोलाचे महत्त्व आहे. आईमुळे समाजात एक चांगला माणूस घडतो, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यीक डॉ. सदानंद मोरे यांनी देहू येथे व्यक्त केले.

देहुतील आई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. मोरे यांच्या हस्ते आई पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ महिला सुभद्रा सोपान काळोखे यांना भिमाई पुरस्काराने तर चंद्रभागा पुनाजी चव्हाण यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरपंच उषा चव्हाण, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, जंगबहाद्दर राव, रूपेश चव्हाण, अभिमन्यू काळोखे, बाळासाहेब काळोखे, अतुल काळोखे आदी मान्यवर व्यासपीठावर होते. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वनिता देशकर, तुकाराम चिखले, काश्मिर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करून बेटी बचाव-बेटी पढावचा संदेश देणार्‍या पूजा बुधावले यांचाही सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे सचिव रशीद धोंडफोडे यांनी प्रस्ताविक केले. उमेश टिजगे यांनी सूत्रसंचालन केले.