आई-वडिलांना आयपीएस लॉबी व पोलिस अडकवताहेत!

0

मुंबई । मुलुंडमधील रिया पालांडे आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण प्राप्त झाले आहे. 23 नोव्हेंबरला रिया पालांडेने राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी आणि त्यांच्या पत्नी भारती चौधरी जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्या दिवसापासून ते दोघेही फरार आहेत. आता याप्रकरणी दामोदर चौधरी यांच्या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. यात मीनाक्षीने आपल्या आई-वडिलांना आयपीएस लॉबी अडकवत असल्याचा आरोप केला आहे.

दाखल झालेला गुन्हा हे आपल्याविरुद्धचे छडयंत्र असून आयपीएस लॉबी आणि पोलिसांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत आत्महत्या करणार असल्याचे ती या व्हिडीओमध्ये सांगत आहे. तसेच पोलीस यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांवरील विश्‍वास उडाला असून आपण आत्महत्या करत असल्याचे तिने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर मीनाक्षीने तिचा मोबाइल बंद केला आहे. पोलीस जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या रिया पालांडे (47) या महिलेनं राहत्या घरी आत्महत्या केली. गेल्या चार वर्षांपासून मुलुंड पूर्वेकडील समर्थ व्हिलामध्ये रिया पालांडे, मुलगा शुभम आणि मुलगी श्रद्धासोबत भाडेतत्त्वावर राहत होत्या.

रिया या पूर्वी गव्हाणपाडा परिसरात राहत होत्या. त्या व्याजाने पैसे द्यायच्या. मात्र मधल्या काळात व्याज न मिळाल्याने हे व्यवहार बंद पडल्याचे समजते. गुरुवारी पालांडे यांनी पोलीस कुटुंबाच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली. तसे सुसाईड नोटमध्ये त्यांनी नमूद केले. या प्रकरणी एलए 4चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी, पत्नी भारती चौधरी आणि मुलगी मीनाक्षी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रिया पालांडे यांचा मुलगा शुभम गायब झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी मिसिंगची तक्रार नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.