आई वडिलांसह कुटुंबात स्वर्ग पाहणारा आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही

0

चाळीसगाव । जो व्यक्ती चांगल्या गोष्टी शोधतो तो माणूस स्वतः चांगला असतो. जीवनात प्रथम प्राधान्य आई-वडिलांना, दुसरे आपल्या कामाला आणि तिसरे प्राधान्य हे उद्याचे भविष्य असणार्‍या मुलांना दिल पाहिजे. आईला गोडवा आणि बापाला मुलांमध्ये कर्तव्य हव असत. आई वडिलांसह कुटुंबात स्वर्ग पाहणारा व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन लातूर येथील जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांनी केले. ते येथील अंधशाळा मैदानावर आयोजित उमंग व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना बोलत होते. सदर व्याख्यान हे उमंग व्याख्यानमालेच्या इतिहासातील अतिशय हृदयद्रावक व्याख्यान ठरले.

डॉ. लहाने यांनी मांडला आयुष्याचा जीवनपट
डॉ. लहाने यांनी आपल्या आयुष्याचा मांडलेला जीवनपट, माई-अण्णांसोबतचे प्रसंग, घराचा आधार असलेले वडीलबंधू पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर आईने स्वतःची किडनी दिल्याचा प्रसंग सांगताना डॉ.लहाने यांच्यासह सर्व उपस्थितांना रडू कोसळले. त्यांच्या जीवनात आई-वडिलांचे असलेले योगदान, कठोर कष्ट आणि मेहनतीचे मिळालेले फळ, रुग्णांच्या सेवेसाठी वाहिलेले जीवन आदींचे छोटे छोटे प्रसंग देखील त्यांनी ज्यापद्धतीने मांडले ते खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी असेच होते.

मुलांनी आयुष्यात शिस्तीत आणि जागरूक राहणे गरजेचे आहे कारण आयुष्यात संधी एकदा नव्हे तर लाखदा येतात परंतु आपण जागरूक असले पाहिजे नाहीतर एकदा संधीने पाठ फिरवली तरी परत येत नाही. अभ्यासाने आपण मोठे होतो म्हणून पुस्तकांचे पाठांतर करणे गरजेचे आहे. स्पर्धा ही प्रत्येक काळात राहते मात्र टिकणे महत्त्वाचे, शिक्षण या संधीला आत्मसात करून आयुष्याचे कल्याण करून घ्या. डॉक्टर झाल्यानंतर गरीब आपणाकडे येवू शकत नाही पण आपण गरिबांकडे जाऊ शकतो हा विचार करून ग्रामीण भागात काम सुरु केले. आजही हे टाळू-फाटलेले ओठ यावरील शस्त्रक्रिया मोफत करत असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
व्यासपीठावर आमदार उन्मेशदादा पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, डॉ.मुकुंद करंबेळकर, केशव रामभाऊ कोतकर, लालचंद बजाज, डॉ.विनोद कोतकर, गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय रतनसिंग पाटील, विजया पवार, उमंग परिवाराच्या संपदा पाटील, संजय भास्कर पाटील, डॉ.शैलेंद्र पवार, सुशील वानखेडे, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी उमंग समाजशिल्पी महिला परिवार, शांतिदेवी चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज, उमंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, उमंग सृष्टी इंग्लिश मेडियम स्कूल, उमंग सृष्टी कौशल्य विकास केंद्राच्या कर्मचारी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.