शिकण्याची इच्छा असताना लग्नाचा आग्रह
पिेंपरी :मुलीला शिकण्याची इच्छा असताना आई-वडिलांनी लग्नाचा आग्रह धरला. तिच्या मनाविरुद्ध साखरपुडा करून लग्नाची तारीख देखील काढली. त्यामुळे चिडलेल्या मुलीने आपल्या आई, वडील, मामा आणि आत्या यांच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. येत्या रविवारी (दि. 22 रोजी) लग्न असताना तिने पाच दिवस अगोदरच आपले घर सोडले आहे. धावडे वस्ती परिसरात राहणार्या 20 वर्षीय तरुणीने भोसरी पोलिसांकडे लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. तिने आई, वडील, मामा आणि आत्या मनाविरुद्ध लग्नासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप अर्जात केला आहे.
या मुलीचे तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिला भविष्यात उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे. परंतु तिच्या आई, वडील, मामा आणि आत्या यांनी तिच्या लग्नाचा तगादा लावला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता तिचा विवाह ठरविण्यात आला. ‘आम्हाला आमचे ओझे कमी करायचे आहे’ असे म्हणत आई-वडील तिच्यावर दबाव टाकत आहेत. 3 डिसेंबर 2017 रोजी तिचा साखरपुडा झाला आहे. तर 22 एप्रिल 2018 रोजी लग्नाची तारीख काढून लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या आहेत.
लग्न न करण्याच्या भूमिकेवर ही तरुणी ठाम असल्यामुळे तिने आई, वडील, आत्या आणि मामा यांच्याविरुद्ध पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. यानंतर मंगळवारी (दि. 17) आई-वडिलांचे घर सोडले आहे. दरम्यान, तिने लग्नाला नकार दिल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी लहान बहिणीला तिच्या जागी लग्न करण्याचा आग्रह सुरु केला. त्यामुळे लहान बहिणीनेही आपल्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेवर ठाम राहत घर सोडण्याचा पर्याय निवडला आहे. पाच दिवसांवर विवाह मुहूर्त असताना दोघींही गायब झाल्याने आई, वडील व नातेवाईकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. तर आता पोलिस या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.