आई व मुलाचा विहीरीत पडून मृत्यू

0

चाळीसगाव । तालुक्यातील आडगाव शिवारात शेतातील विहीरीत 40 वर्षीय महीला व 9 वर्षीय मुलाचा मृतदेह 21 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास मिळुन आला असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला विजय पाटील (रा.आडगाव ता.चाळीसगाव) यांनी खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, आडगाव येथील आशाबाई राजेंद्र पाटील (वय-40 )यांच्यासह मुलगी आडगाव शिवारातील शेतात शेतीकामासाठी गेले होते. दुपारी त्यांचा मुलगा गौरेश राजेंद्र पाटील (वय-9)हा शाळा सुटल्यानंतर शेतात बोरे खाण्यासाठी आला होता. त्याने दुपारी शेतात जावून बोरे खाल्ले त्यानंतर सिमेंटने बांधलेल्या 70 फुट खोल असलेल्या विहीरीच्या भींतीवर जावून बसला. त्यानंतर खेळता खेळता त्याचा तोल जावून विहीरीत पडला. आपला मुलगा विहिरीत पडला हे आई आशाबाई यांच्या लक्षात आल्यानंतर तीने आहे त्या ठिकाणाहून विहीरीकडे धावत आली आणि मुलाला वाचविण्यासाठी तीने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता लागलीच विहीरीत उडी मारली. ही घटना दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली.

बिबट्याच्या दहशतीमुळे कुणीही धावले नाही
ही घटना घडल्यानंतर सोबत काम करत असलेल्या मुलीने आपली आई व भाऊ विहीरीत पडले असल्याचे आरडाओरड केली, मात्र दरम्यान तालुक्यात बिबट्याचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संचार असल्यामुळे या परीसरात बिबट्या आला असावा अशी इतर शेतात काम करणार्‍या शेतकरी व मजूरांनी समजून आपापला जीव वाचविण्यात मग्न राहत तेथून पळ काढला. अशी माहिती मुलीने गावात येवून सांगितली चिमुकलीच्या मदतीला कोणीच आले नाही. कदाचित तिच्या आवाजामुळे दोन तीन जण जरी सरसावले असते तर आज दोघांचा जीव वाचला असता.

मेहुणबारे पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
दोन वर्षापुर्वी मुलाचे वडील राजेंद्र पाटील यांचा या विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता आई व भाऊ यांचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याने परीसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. आता फक्त मुलीसोबत तीचे आजोबा असल्याचे बोलले जात आहे. दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास दोघांचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहीरीतील पाण्यात मिळुन आला आहे. शेजारच्या शेतातील सालदाराला त्यांचा मृतदेह विहीरीतील पाण्यात तरंगताना दिसल्याने ही घटना समजून आली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला विजय पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन तपास साहाय्यक फौजदार नरेंद्र सरदार करीत आहेत.