पाचशे रुपयात कपडे न दिल्याच्या रागातून प्रकार
आकुर्डी : ‘पाचशे रुपयातच कपडे द्या, नाही तर तुम्हाला बघून घेईन’ अशी धमकी देऊन चार जणांच्या टोळक्यांनी दुकानात जबरदस्ती घुसून दुकान मालकावर कोयत्याच्या उलट्या बाजूने मारुन जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.6) रात्री साडेआठच्या सुमारास आकुर्डी येथील सरकारी रुग्णालया समोर असलेल्या ममता गारमेंट्स नावाच्या दुकानात घडली. याप्रकरणी दुकान मालक पुराराम चौधरी (वय 36, रा. आकुर्डी) याने निगडी पोलीस ठाण्यात चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद आहे.
चौघांच्या टोळक्याकडून तोडफोड
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुराराम यांचे आकुर्डी येथे ममता गारमेंट्स नावाचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारा या दुकनात पुराराम आणि त्यांचे सहकारी कामगार मनाराम चौधरी हे होते. यावेळी त्यांच्या दुकानात तीन अनोळखी इसम कपडे घेण्यासाठी आले. त्यांनी पुराराम यांना ‘आम्हाला पाचशे रुपयातच कपडे द्या’, अशी धमकी दिली. यावर पुराराम यांनी त्यांना पाचशे रुपयातच कपडे देणार नाही असे सांगितले. यावर तीनही आरोपींनी त्यांच्या एका साथीदाराला दुकानात बोलावून घेतले. तसेच त्यांच्या जवळील कोयत्याने दुकानाची तोडफोड करुन कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादी पुराराम यांच्या पाठीवर वार करुन फरार झाले. निगडी पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.बी.खारगे तपास करत आहेत.