उपोषण करण्याचा नगरसेविकेचा इशारा
पिंपरी – काळभोरनगर, आकुर्डी परिसरात गेल्या वर्षभरापासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशी हैराण झाले आहेत. हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा. अन्यथा, महापालिकेसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी दिला आहे. यासंदर्भात मीनल यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
काही दिवसातच जैसे थे
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मीनल यादव म्हटल्या की, प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर, मोहननगर, आकुर्डी, दत्तवाडी परिसरातील पाणीपुरवठा गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे विस्कळीत आहे. लेखी किंवा तोंडी तक्रार दिल्यास काही दिवसांसाठी पाणीपुरवठा सुरळीत होतो. परंतु, पुन्हा काही दिवसातच ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. विविध भागात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने नागरिक विशेषत: महिला वर्ग त्रस्त आहे. सध्या एक वेळच पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात केवळ अर्धा तास पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असल्याने काही वेळातच पाणीपुरवठा बंद होतो. नोकरी करणार्या महिला वर्गाला तर आठवडाभराचे पाणी साठवून ठेवावे लागते. काही भागात तर नागरिकांना बाहेरून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
महिलावर्गाला त्रास
महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार देऊनही हा प्रश्न सुटत नाही. पाणी न येणे, कमी दाबाने येणे, उशिरा येणे असे प्रकार येथील लोकांना नित्याचेच झाले आहेत. या समस्येमुळे नागरिकांना विशेषत: महिला वर्गाला अतिशय त्रास सहन करावा लागतो. कधी रात्री-अपरात्री नळाद्वारे पाणी येते. त्यामुळे कामगारांचे हाल होतात. मागील वर्षी दिवाळीपूर्वी महापालिकेवर हंडा मोर्चा काढल्यानंतर नवीन जलवाहिनीचे काम सुरू झाले. मात्र, गेल्या एक महिन्यापासून प्रभागात पुन्हा पाणीटंचाईचे प्रकार वाढले आहेत. 30 दिवसांपैकी 15 ते 20 दिवस नागरिकांच्या तक्रारी येतात. महिनाभर आयुक्त रजेवर असताना संबंधित अधिकारी कोणतीही जबाबदारी घेत नव्हते. आता आयुक्तांनी पुन्हा सुत्रे घेतली आहेत. त्यामुळे या विषयात लक्ष घालून प्रभागातील पाण्याची मुलभुत समस्या त्वरित मिटवावी. अन्यथा, महापालिकेसमोर उपोषण करण्यात येईल.