रेल्वे, वीज कंपनी, आयुध निर्माणीतील अॅप्रेटींसधारक, सुशिक्षित बेरोजगार युवकांचा मोर्चात सहभाग ; लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा ; बेरोजगार युवकांच्या विविध मागण्यांसह न्याय हक्कासाठी भुसावळ ते जळगाव पायदळ मोर्चा ; आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार
भुसावळ- सरकार हमसे डरती है, इसलिये पोलिस को आगे करती हे, करेंगे लढेंगे, पियुष गोयल मुर्दाबाद, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, तरुणांना रोजगार नाही तर सरकार काय कामाचे यासह विविध घोषणांनी बुधवारी शहर दुमदुमले. निमित्त होते ते बेरोजगार युवकांच्या विविध मागण्या तसेच न्याय हक्कासाठी भुसावळ ते जळगाव पायदळ मोर्चाचे. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) पासून बुधवारी दुपारी तीन वाजता लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात पायदळ मोर्चाला सुरुवात झाली. प्रसंगी रेल्वेत अॅप्रेंटीस केलेल्या युवकांपैकी फक्त 20 टक्केच युवकांना नोकरीच्या वेळी स्थान दिले जाईल, या रेल्वेने काढलेल्या फतव्याचा निषेध करण्यात आला तर रेल्वे, वीज कंपनी, आयुध निर्माणीतील अॅप्रेटींसधारक, सुशिक्षित बेरोजगार युवक या मोर्चात सहभागी झाले.
घोषणासह फलकांनी वेधले लक्ष
डी.एस.ग्राऊंड, गांधी पुतळा, नगरपालिका दवाखाना, बाजारपेठ, जामनेर रोड, अष्टभूजा मंदिर, नाहाटा महाविद्यालयामार्गे निघालेल्या मोर्चात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्या युवकांच्या हाती बेरोजगारांचा आक्रोश, लढेंगे, जितेंगे असा आशय असलेल्या फलकांचा समावेश होता. रेल्वे मंत्री पियुष गोयल मुर्दाबाद, वुई नीड जॉब, महानिर्मिती, महावितरण, महापारेषणमध्ये अॅप्रेंटीस धारकांना कायमस्वरुपी नोकरीत घ्यावे या फलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी मोर्चेकर्यांना केळी, बिस्कीटचे पुडे वाटप करीत पाण्याची व्यवस्था जामनेर रोडवर केली होती. मोर्चासोबत रूग्णवाहिका, पालिकेचा अग्निशमन बंब तैनात ठेवण्यात आला.
नाहाटा चौफुलीवर वाहतूक ठप्प
बुधवारी 4.40 वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुलीवर मोर्चा धडकल्यानंतर युवकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प् झाली तर युवकांनी पुन्हा जोरदारपणे सरकारच्या विरूध्द घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी महामार्गावरील जळगावकडून येणारी वाहतूक थांबवली होती. तर मुक्ताईनगर, भुसावळकडून जळगावकडे जाणार्या वाहनांना जामनेर मार्गाने रवाना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिला पाठिंबा
लोकसंघर्ष मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला. तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, शहराध्यक्ष नितीन धांडे, युवक शहर अध्यक्ष रंजित चावरीया, मुन्ना सोनवणे, गोपाळ भदाणे, सागर पाटील, अमोल मांडे, राकेश पाटील आदी उपस्थित होते.
आज जिल्हाधिकार्यांना देणार निवेदन
बुधवारी रात्री उशिरा नशिराबाद येथे मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सकाळी पुन्हा मोर्चेकरी जळगाव येथे धडकणार असून प्रसंगी जिल्हाधिकार्यांनी निवेदन देण्यात येणार आहे. ऑल इंडीया रेल्वे अॅप्रेटीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वे मध्ये भरती करवी व 20 टक्के कोटा तत्काळ रद्द करावा, महानिर्मिती, महावितरण, महापारेषण, आयुध निर्माणी, महाराष्ट्र एसटी महामंडळ येथील अॅप्रेटीस विद्यार्थ्यांना कायम स्वरूपी नोकरी देण्यात यावी यासह विविध मागण्यांबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला.