मुंबई । कमला मिल आगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युग तुली याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपीला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कमला मिल अग्निकांडांत 14 जणांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी युग पाठक, जिगर संघवी, क्रिपेश संघवी आणि अभिजीत मानकर या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपींनी वेगवेगळे जामीन अर्ज दाखल केले आहेत. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कमला मिल कंपाऊंडमधील दुर्घटनेचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये म्हटले आहे, की मोजो बिस्त्रो या उपाहारगृहाची गच्ची अनधिकृतपणे ’कव्हर’ करण्यात आली होती. यासाठी अनेक ज्वालाग्राही बाबींचा वापर करण्यात आला होता. याच ठिकाणी बेकायदेशीरपणे असलेल्या हुक्क्यातून ठिणग्या उडून आग लागली, असा निष्कर्ष संबंधित अहवालाच्या आधारे काढण्यात आला. हीच आग पुढे ’वन अबव्ह’ उपहारगृहातदेखील पसरली. या उपहारगृहात मोठ्या प्रमाणात अती ज्वालाग्राही पदार्थ होते.
विशाल कारियाची कसून चौकशी
कमला मिल अग्निकांडातील आरोपींना आश्रय देणार्या विशाल कारियाच्या आर्थिक प्रगतीने मुंबई गुन्हे शाखेच्या भुवया उंचावल्या आहेत. ही प्रगती त्याने कशी साध्य केली हे जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशालची चौकशी पुढे सुरू राहाण्याची दाट शक्यता आहे. नववीपर्यंत शिकलेला विशाल कारिया दहा वर्षांपूर्वी सोनी मोनी मॉलमध्ये सात ते आठ हजार रुपये पगारावर मजुरी करत होता. मात्र, आजघडीला पश्चिम उपनगरांत त्याच्या नावे दोन रेस्टॉरेन्ट-बार आहेत. या दोन्ही आस्थापनांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक भागीदारी विशालची आहे तसेच जुहू येथे आलिशान घरात त्याचे वास्तव्य आहे, अशी माहिती या चौकशीतून मिळाली.
विशालचे वडील रंगांचे घाऊक विक्रेते होते. या पार्श्वभूमीवर तो दोन हॉटेलचा मालक कसा बनला, क्रिकेट विश्वातील आघाडीच्या खेळाडू, क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधित पदाधिकार्यांशी त्याची ओळख कशी, याबाबत चौकशी केली गेली. मात्र, त्याने या चौकशीला फारसे सहकार्य केलेले नाही. गुन्हे शाखेने विशालच्या गेल्या दहा वर्षांमधील हालचाली तपासण्यास सुरूवात केली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींबाबतही चौकशी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या आठवडयात कमला मिल प्रकरणातून विशालने जामीन मिळवला. गुरुवारी रात्री भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग जुहू येथील विशालच्या निवासस्थानी उपस्थित होता. हरभजनची पत्नी, अभिनेत्री गीता बसरा आणि विशाल एकमेकांना आधीपासून ओळखतात.